आरोग्यानामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणामुळे मधुमेह होण्याचे प्रमाण आपल्याकडे जास्त असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे डॉक्टर सर्वच मधुमेहाच्या रूग्णांना व्यायाम करण्याचा सल्ला देतात. या रूग्णांनी व्यायाम केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते. शिवाय, नियमित व्यायाम केल्याने मानसिक स्थिती, आत्मविश्वास आणि हृदयाच्या आरोग्यात सुधारणा होते.
व्यायाम केल्यास मधुमेहाच्या रूग्णांची शारीरीक उर्जा खर्च होऊन वजन कमी होण्यास मदत होते. शारीरिक हालचालीमुळे योग्य बीएमआय राखण्यासही मदत होते. शरीरातील चरबी कमी होते. व्यायाम करताना तुमच्या शरीरातून काही रसायने स्रवल्याने रिलॅक्स झाल्यासारखे वाटते. यामुळे मानसिक ताण आणि नैराश्य कमी होऊ शकते. तसेच गरोदरपणात नियमित शारीरिक व्यायाम केला तर गरोदरपणात मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. तसेच इन्सुलनिची गरज किंवा तोंडावाटे घेण्याच्या हायपोग्लायसेमिक औषधांची आवश्यकता कदाचित कमी होऊ शकते.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य, रक्तातील कोलेस्टरॉलची पातळी, रक्तदाबाची पातळी यात सुधारणा होते. पुरूषांनी नियमित व्यायाम केल्यास इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या कमी होते. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य नियोजन करावे. मधुमेहात रक्तातील साखर खुपच वाढल्यास अपुऱ्या रक्तप्रवाह आणि नसेला इजा पोहोचल्याने पायाची समस्या जाणवते. अशा व्यक्तींनी पायाच्या सुरक्षेसाठी आरामदायक बूट घालावेत. तसेच व्यायामासंदर्भात डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.