आरोग्यनामा ऑनलाइन टीम : कोणतेही दुखणे कमी करण्यासाठी सतत औषधे घेणे योग्य नसते. काही सहजसोप्या पद्धतीने दुखण्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. शरीरातील कोणत्याही भागात साधारण दुखत असल्यास त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. दुखणे ही एक अनुभूती आहे. मेंदूवर नियंत्रण मिळवत दुखणे आटोक्यात आणता येते. वातावरणात आणि विचारात केलेले थोडेसे बदलदेखील दुखण्याला कमी करू शकतात. या पद्धतीने मेंदूला संदेश जातो आणि तो त्यावर प्रतिक्रिया देत दुखणे कमी करतो.
मन दुसरीकडे वळवावे
आपले सर्व लक्ष दुखणाऱ्या भागाकडे असते. दुखण्याची प्रक्रिया शरीराचा एक प्रणाली आहे. ज्यात शरीरातील अडचणींवर सगळे लक्ष केंद्रित होते. यादरम्यान स्वत:ला इतर कामांत गुंतवल्यास अथवा मन वळवल्यास दुखण्याचा त्रास कमी होतो.
कला जोपासाव्यात
काही दुखत असल्यास अशावेळी एखादी कला उपयोगी पडू शकते. एखादे वाद्य वाजवणे, पेंटिंग करणे, बागकाम करणे किंवा लेखन केल्यास दुखण्याचे काही काळ विस्मरण होते. आवडीचे काम करताना लक्ष दुखण्यावर केंद्रित न होता अन्य कामात गुंतवल्याने त्रास कमी होतो.
वातावरण बदलावे
शरीराचा एखादा भाग दुखत असल्यास आजूबाजूच्या वातावरणात बदल करून दुखणे कमी करता येते. दुखण्यावेळी बागेत फेरफटका मारावा, टीव्ही पाहावा, गाणे गावे, पुस्तक वाचावे. यामुळे मेंदूचे लक्ष दुसरीकडे वळते आणि दुखणे कमी होते.
ध्यान धारणा करावी
ध्यानधारणा करणे हा दुखण्यावर अत्यंत उपयोगी उपचार आहे. ध्यान करताना मेंदूचा विशेष भाग जागृत होतो. यामुळे डोके, पोट आणि जखमेच्या दुखणे कमी करता येते. दुखण्याच्या ३९ टक्के प्रकारात ध्यान लाभदायी ठरते.
श्वासावर नियंत्रण
दीर्घश्वास घेणे आणि सोडणे यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये हालचाल निर्माण होते. ज्यामुळे शरीरातील मांसपेशींना सैल होण्याचा संकेत मिळतो. परिणामी, शरीरात होत असलेले दुखणे कमी होते. श्वासावर नियंत्रण ठेवल्याने दुखणे १२ टक्क्यांपर्यंत कमी होते.