आरोग्यनामा ऑनलाइन – नियमित व्यायाम केल्यास शरीराच्या गरजाही वेगळ्या असतात. व्यायाम केल्याने खर्च होणाऱ्या कॅलरीज भरून काढण्यासाठी चांगला आहारही महत्वाचा असतो. याकडे लक्ष दिले नाही तर शरीराचे नुकसान होऊ शकते. व्यायामाचा लाभ हा आहारावरही अवलंबून आहे. यासाठी आपण काय खातोय हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कर्बोदके आणि प्रथिनयुक्त आहार घेतल्यास पूर्ण ताकदीने व्यायाम करता येईल.
सर्वसाधारणपणे आपल्याला कर्बोदकं (कार्बोहायडेट्स) ही पोळी, भात, पास्ता, ब्रेड, फळं आणि सर्व प्रकारच्या भाज्यांमधून मिळतात. तर प्रथिने (प्रोटीन) ही मटण, चिकन, मासे, अंडी, सोया आणि सर्व दुग्धजन्य पदार्थांमधून मिळतात. कर्बोदके शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. खेळाडूंसाठी कर्बोदकेयुक्त आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रथिने कर्बोदकांबरोबर काम करत शरीर अधिक सुदृढ आणि आरोग्यदायी बनवते. वेट टेनिंगमुळे शरीराला जास्त प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते. अति प्रमाणात प्रथिनांचं सेवन केल्यास शरीराला त्रासदेखील होऊ शकतो. अति प्रमाणात प्रथिनं शरीरात गेल्यास किडनीशी संबंधीत त्रास होऊ शकतो. व्यायाम करताना शरीर ऊर्जादायी असणे गरजेचे आहे. यासाठी व्यायाम करण्याअगोदर दोन-तीन तास पोटभर खाल्ले पाहिजे. ओट्स, चिकन सँडविच, सलाड सँडविच, पास्ता, दूध किंवा व्हीट ब्रेड हा उत्तम पर्याय आहे. व्यायाम करण्यापूर्वी एक तास अगोदर काहीही खाऊ नये. कारण पचनक्रिया सुरू असताना व्यायाम करणे त्रासदायक ठरू शकते.
कर्बोदकं आणि प्रथिने यांचे ४ :१ असे प्रमाण असलेला आहार व्यायामानंतर घ्यावा. व्यायाम केल्यानंतर ४५ मिनिटांच्या आत काही तरी खावे. ही पोषणतत्त्वे शोषून घेण्यासाठीची सर्वोत्तम वेळ असते. वर्कआउटनंतर सफरचंद, केळे आणि सुकामेवा असा पौष्टिक आहार घ्यावा. बिस्किटे, चॉकलेट आणि कँडी खाणे टाळावे. व्यायाम करताना घाम येतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने पाणी पिणे गरजेचे आहे. व्यायाम करण्याआधी, करताना आणि केल्यावर पाणी प्यायला हवे.