आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरेशी झोप न घेतल्याने, वारंवार झोपमोड झाल्याने अनेकजण त्रस्त असतात. अशा व्यक्ती नियमित व्यायाम करत असतील तर त्यांच्या व्यायामावरही वाईट परिणाम होतो. व्यायाम करताना शरीराला भरपूर ऊज्रेची गरज भासते. यामुळे जर पुरेशी झोप मिळाली नसल्यास थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. अशावेळी स्नायू कमी ऊज्रेतही अधिक मेहनत करतात. यामुळे व्यायामानंतर शारीरिक खूप थकवा जाणवतो.स्नायूंमध्ये कमजोरी आल्याने जास्त जोर लावता येत नाही. अशा परिस्थितीत व्यायाम करणाऱ्यास व्यायामाचा फायदा पूर्णपणे मिळत नाही. यासाठी सात ते आठ तासांची झोप घेणे अतिशय गरजेचे आहे. पुरेशी झोप न झाल्याने शरीरात स्ट्रेस हार्मोन कार्टिसॉलची सक्रियता वाढते. यामुळे स्नायू आणि हाडांवर नकारात्मक परिणाम होतो.
ज्या व्यक्ती वजन नियंत्रित करण्यासाठी व्यायाम करतात आणि प्रोटिन सप्लिमेंट्सचे सेवन करतात, त्यांना योग्य लाभ मिळत नाही. शरीरात स्ट्रेस हार्मोन कार्टिसॉलची पातळी वाढल्याने रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे जेवणातही अनियमितता येऊन ओव्हरइटिंगचा धोका वाढतो. व्यक्ती जंक फूड, चरबी असलेले खाद्य पदार्थ आणि स्नॅक्स खाण्यासाठी प्रेरित होतो. यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. पुरेशी झोप न झाल्यामुळेही तणावाची स्थिती निर्माण होते.पुरेशी झोप न झाल्याने मेटाबॉलिझमवरही विपरीत परिणाम होतो.
यामुळे पाचन क्रियेशी संबंधित समस्या निर्माण होतात आणि वजन वाढू लागते. यामुळे वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरूअसतील तर त्यामध्ये यश मिळणार नाही. झोपेत शरीरातील ग्रोथ हार्मोन किंवा पेप्टाइड नावाचे हार्मोन सक्रिय असतात. याउलट पुरेशी झोप न झाल्याने हे हार्मोन सक्रिय राहत नाहीत किंवा या हार्मोन्सच्या कार्यप्रणालीत अडथळा येतो. परिणामी शरीर जेवणातील पोषक द्रव्य शोषून घेत नाही. अशा वेळी व्यक्तीने जेवणात कितीही पोषक द्रव्यांचा समावेश केला तरी त्याला कोणताच फायदा मिळत नाही. रात्री उशिरा व्यायाम केल्याने झोपेशी संबंधित समस्या निर्माण होतात, कारण यामुळे शरीराचे तापमान वाढते. चांगली झोप येण्यासाठी शरीराचे तापमान कमी असणे गरजेचे आहे. त्यामुळे जे लोक वेळेअभावी रात्री व्यायाम करतात, त्यांनी झोपण्याच्या तीन ते चार तासांपूर्वी व्यायाम करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.