आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जीममध्ये जाण्यासाठी सर्वांकडेच वेळ नसतो. काहीजण सकाळीच उठून कामावर जाण्याच्या गडबडीत असतात. दिवसभर असे लोक कामाच्या ठिकाणी असतात. तसेच काम पूर्ण होईपर्यंत रात्र झालेली असते. त्यामुळे जीममध्ये जाण्यासाठी वेळच मिळत नाही. मात्र, जीममध्ये जाता येत नाही म्हणून व्यायामच करायचा नाही असे करू नये. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीत इनडोअर वा आउटडोअर व्यायामासाठी थोडा तरी वेळ काढलाच पाहिजे. आरोग्य चांगले रहाव अशी प्रबळ इच्छा असल्यास अनेक पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. हे पर्याय कोणते ते पाहुयात.
बिझी शेड्यूलमध्येही व्यायाम करण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी घर, कार्यालयात जाताना अथवा येताना लिफ्टऐवजी शिड्या चढून जावे. त्यामुळे कॅलरी बर्न होईल आणि स्नायूंची सक्रियता वाढेल. सकाळ-संध्याकाळ पाळीव प्राण्यांना फिरायला घेऊन जावे. त्यामुळे पाळीव प्राण्यासही आनंद होईल. घरी नियमितरीत्या वर्कआउट शेड्यूल पाळू शकत नसाल तर संगीत ऐकावे. त्यामुळे व्यायाम करण्याचा आनंद घेता येईल व रूटीनबाबत कंटाळा येणार नाही.
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही घरीदेखील व्यायाम करण्यास असमर्थ असाल तर किमान घरातील कामे तरी स्वत: करा. त्यामुळे स्नायूंची लवचीकता वाढेल आणि तुम्ही सक्रियदेखील राहाल. तसेच पुरुषांनी भाजीपाला खरेदी करण्यास पायीच जायला हवे.जिममध्ये जायचे नसेल तर मॉर्निंग वॉक, जॉगिंग, सायकलिंग वा स्वीमिंगसारखे उत्तम पर्याय आहेत. इच्छेनुसार कोणताही व्यायाम करता येतो. या व्यायामांचा नियम इच्छा नसतानाही वारंवार तुटत असेल तर या व्यायामांशी जवळच्या मित्रांनाही जोडण्याचा प्रयत्न करावा. मित्र सोबत असल्याने रूटीन पाळले जाईल.