आरोग्यनामा ऑनलाईन टीम – महाराष्ट्रात वांग्याचे पीक मोठ्याप्रमाणात घेतले जाते. या भाजीला बाजारात मोठी मागणी आहे. वांग्याची भाजी व भरीत हे पदार्थ प्रचलित आहेत. साधारणपणे प्रत्येक घरात ही भाजी खाल्ली जाते. परंतु, वांग्यामध्ये औषधी गुण सुद्धा आहेत, हे अनेक जणांना माहिती नसते. वांग्यामध्ये खोकला तसेच अन्य संक्रमित आजारांना दूर करण्याची क्षमता आहे. देशातील काही भागांमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वांगे वापरले जाते. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता, अपचन, डायबिटीज इत्यादी समस्या दूर होतात. वांग्याचे काही खास उपाय आणि फायदे यांची माहिती आपण घेणार आहोत.
या आजारांवर गुणकारी
* वांगे चुलीवर भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकून खाल्ल्यास खोकला बरा होण्यास मदत होते आणि कफ बाहेर पडतो.
* वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर्स असतात, यामुळे वजन कमी करता येते. वांग्याचे सेवन केल्याने शरीरातील फायबर्सचे प्रमाण वाढते आणि यामुळे कॅलरीज कमी होऊ शकतात. फायबर्सचे पोटातील प्रमाण वाढल्यामुळे भूक शांत होते.
* जेवणापूर्वी अध्र्याकच्च्या वांग्यासोबत सलाड आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
* भाजलेल्या वांग्यावर चवीनुसार मध टाकून रात्री खाल्ल्यास शांत झोप लागते. वांग्याच्या सेवनाने अनिद्रेची समस्या दूर होते.
* चुलीवर भाजलेल्या वांग्यामध्ये थोडीशी साखर टाकून सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते, असे काही आदीवासी बांधव सांगतात.
* वांग्याचे सूप तयार करून त्यामध्ये हिंग आणि चवीनुसार लसुन टाकून सेवन केल्यास पोट फुगणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता, अपचन आदी समस्या दूर होतात.
* वांग्यामध्ये भरपूर फायबर असते. यामुळे टाइप २ डायबिटीज ग्रस्त रुग्णांनी नियमित वांग्याचे सेवन केल्यास साखर नियंत्रणात राहू शकते.
* वांग्याचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार ठीक करण्यासाठी उत्तम आहे. शरीरातील आयर्नचे जास्त प्रमाण नुकसानदायक ठरू शकते. वांग्यातील नासुनीन नावाचे रसायन शरीरातलं अतिरिक्त आयर्न नियंत्रित करते. या कारणामुळे हृदय संचालन सामान्य राहते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो.