#YogaDay2019 : योगामुळे कमी होते नैराश्याची तीव्रता
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : नियमित योगा केल्याने नैराश्य दूर होऊ शकते. तसेच योगा मेंदूतील विशिष्ट रसायनांची पातळी वाढविण्यास मदत करतो. झोपेचे चक्र, मनाची स्थिती, भूक आणि पचन क्रियेला नियंत्रित करण्याचे काम योगा करतो,असा निष्कर्ष ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने (एम्स) एका संशोधनातून व्यक्त केला आहे.
तणावाला कारणीभूत असणारे हार्मोन कमी करण्यास योगा मदत करतो. त्यामुळे तणाव कमी होतो. योगामुळे मानसिक तणाव कमी होतो. या संशोधनासाठी १२ आठवडे अभ्यास केल्यानंतर हे निष्कर्ष समोर आले आहेत. नैराश्य ही प्रमुख आरोग्य समस्या आहे. यामुळे लक्षणीय विकृतीसह अन्य आजार उद्भवतात.
बालपणात घडलेल्या प्रतिकूल घटनाही नैराश्याला कारणीभूत ठरतात. नैराश्यामुळे शरीराच्या सुरक्षणात्मक नियामक यंत्रणेत अडथळा निर्माण होतो व अनुवंशिक चक्र व पेशींच्या कार्याला हानी होते. शरीरातील तणावाचा प्रतिकार करणाऱ्या यंत्रणेलाच नैराश्य बाधित करते. औषधोपचार व मानसोपचार हे नैराश्यावरील उपचार आहेत. नैराश्यावर योगाच्या माध्यमातून उपचार केल्यास शारिरीक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.