एखाद्या स्त्रिला होणाऱ्या ‘या’ सामान्य समस्यांना आजार समजू नका

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी थांबणे होय. वयाच्या १२ व्या वर्षापासून सुरू झालेल्या मासिक पाळीचा बंद होण्याचा कालखंड म्हणजे रजोनिवृत्ती होय. ४५ ते ५० या वयोगटादरम्यान महिलांना रजोनिवृत्तीमधून जावे लागते. याकाळात हार्मोनल बदलांमुळे शरीराच्या गरजाही बदलतात. त्यामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञ सांगतात.

या समस्या उद्भवतात

रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात महत्त्वाचे बदल जाणवतात. मासिक पाळीत अनियमितता येणे, हाडांची दुखणी उद्भवणे, लठ्ठपणा जाणवतो, नैराश्य, मानसिक कुचंबणा, चिडचिडेपणा, वारंवार जाणवतो. त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. त्वचेवरील चमक कमी होते. आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. अपचनाच्या तक्रारी सुरू होतात. भरपूर महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. समागमाची इच्छा कमी होते. झोप कमी येते. स्तनांचा आकार लहान होतो. वारंवार लघवी येते. हे बदल रजोनिवृत्तीच्या काळात होतात.

हृदयाचे आजार वाढू शकतात

रजोनिवृत्तीनंतर हृदयाचे आजार वाढण्याची शक्यता वाढते. कारण शरीरातील इस्टरोजनचा स्तर कमी होतो. रजोनिवृत्तीनंतर कॉरोनरी रक्तवाहिनीतसुद्धा कोलेस्टेरॉल साचण्याची किंवा जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे रक्त साकाळून रक्तवाहिन्यांच्या पोकळीत गुठळी तयार होते आणि पोकळी बंद होते. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया मंद होते. रक्ताभिसरण क्रिया मंद झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

वजन वाढणे

रजोनिवृत्तीनंतर वजन वाढण्याचा धोका असतो. व्यवस्थित आहार नियोजन असेल तर व्याधींवर आपण मात करू शकतो.

हार्मोनल बदल

रजोनिवृत्तीमुळे तणाव, चिंता, स्मरणशक्ती कमी होणे, मानसिक अस्थिरता, एकटेपणा जाणवणे, भूक न लागणे अशा समस्या होतात. हे सर्वकाही हार्मोनल बदलामुळेच होते आणि हे सामान्य आहे.

हे उपाय करा

१. रात्री १० ते १२ मनुका पाण्यात भिजत घालून सकाळी उठल्यावर चावून खा यामुळे रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी होईल.
२. नाहक गोष्टींचा ताण मनावर येत असेल तर रोज सकाळी अद्रक आणि मध एकत्रित घ्या.
३. सातत्याने विस्मरण होत असल्यास १ कप दुधासोबत पिस्ता पावडर घ्या.
४.युरिनवाटे उष्णता बाहेर काढण्यासाठी संत्र्याचा रस घ्या किंवा रोज एक सफरचंद खा.
५. सातत्याने अंग गरम होत असेल तर १०० ग्रॅम द्राक्ष रोज खा.
६. उन्हाळ्यात उसाचा रस आवर्जून घ्या.
७. आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करा.