आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेली जीवनशैली, कामाचा ताण, कामाचे वाढलेले तास, स्पर्धा यामुळे मानसिक ताण-तणावाला सातत्याने तोंड द्यावे लागते. अशा स्थितीचा वैयक्तिक आयुष्यावर वाईट परिणाम होत असतो. जीवनातील आनंद हा आपल्या कामाएवढाच महत्वाचा असतो. कारण यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. योग्य उपाय केल्यास तणावग्रस्त जीवनही आनंदी होऊ शकते. अशाच काही उपायांची माहिती आपण करून घेणार आहोत.
विनोदी चित्रपट पहा
जीवनातील आनंद वाढवण्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही. काही छोटे-छोटे उपाय सुद्धा तुम्हाला आनंद देऊन जातील आणि तुमचा तणाव दूर करतील. तणाव जाणवत असल्यास काम थोडावेळ बाजूला ठेवून मनमोकळेपणाने हसावे. हा ताणतणावावर अत्यंत चांगला उपाय आहे. तणाव जाणवत असल्यास एखादा विनोदी चित्रपट किंवा व्हिडिओ पाहावा. यामुळे मूड चांगला होतो.
आवडते गाणे गुणगुणे लाभदायक
शरीराची हायड्रेशन लेव्हल दोन टक्क्यांवर आली तर मेंदूच्या कार्यप्रणालीवर वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत कामावर लक्ष न लागणे, चिडचिड होणे किंवा तणाव निर्माण होणे, अशी लक्षणे दिसतात. यासाठी दिवसभरात भरपूर पाणीसुद्धा प्यायले पाहिजे. मूड खराब झाल्यास आपले आवडते गाणे गुणगुणणे लाभदायक असते. गाणे म्हटल्याने श्वास आपोआपच मंदावतो. हा उपाय कार्यालयात किंवा कार चालवताना कुठेही करता येतो. हे तंत्र ध्यानधारणेच्या समान काम करते.
दिर्घ श्वास घ्या, रिलॅक्स व्हा
नेहमी जास्तीत जास्त दीर्घ श्वास घ्यावा तसेच श्वास सोडतानादेखील तेवढाच वेळ घ्यावा. उदाहरणार्थ जर श्वास घेण्यासाठी चार सेकंद लागत असतील तर श्वास सोडण्यासाठीदेखील तेवढाच वेळ लागला पाहिजे. अशा प्रकारे जर दहा वेळा श्वास घेतला, तर मेंदू व शरीर दोन्हीही रिलॅक्स होतील, असे ‘द योगिक प्रिस्क्रिप्शन फॉर हेल्थ अँड हिलिंग’ने म्हटले आहे.
आठवणींना उजाळा द्या
त्रस्त करणाऱ्या विचारांतून बाहेर पडायचे असेल तर जूनी आवडती छायाचित्रे पहावीत. कधीही तणावग्रस्त असल्यास डोळे बंद केल्यानंतर जुने आनंदी क्षण आठवावेत. यामुळे मेंदू शांत होतो.