आरोग्यनामा ऑनलाइन टीम – धकाधकीच्या आयुष्यात हृदयाला खूप तणावाला सामोरे जावे लागते. यासाठी हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. हृदयाच्या आरोग्यासाठी खूप जास्त प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. काही सामान्य गोष्टी लक्षात ठेवल्या तर हृदयाला निरोगी ठेवता येते. आहारात केलेल्या बदलांमुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकारांपासून बचाव करता येतो.
ही काळजी घ्या
* भरपूर झोप घेतल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. तसेच उच्च रक्तदाबाच्या समस्येतूनही सुटका होते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी या दोन्हीही गोष्टी फायदेशीर आहेत. दिवसभरातून कमीत कमी सात ते नऊ तासांची झोप घ्यावी.
* मिठाचे जास्त सेवन केल्यास थेट परिणाम रक्तदाबावर होतो. शरीरात मिठाचे प्रमाण वाढल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. हृदयाला या धोक्यापासून वाचवण्यासाठी जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे.
* जीवनसत्त्वे आणि मिनरल्सचे सप्लिमेंट्स घेणे हृदयविकारांपासून बचाव करण्याची सोपी पद्धत आहे. कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यासाठीही बाजारात भरपूर औषधे उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने या औषधांचे सेवन करता येते.
* तणावामुळे हृदयविकारांचा धोका अप्रत्यक्षरीत्या वाढतो. तणाव वाढल्याने रक्तदाब वाढतो आणि यामुळे हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा अचानकपणे वाढतो. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. योगासने आणि आध्यात्माच्या मदतीने हे टाळता येऊ शकते.
* व्यसनाचा थेट हृदयावर परिणाम होतो. अल्कोहोलमुळे झोपमोड होते, तणाव आणि तणावामुळे रक्तदाब वाढतो. ही संपूर्ण प्रक्रिया हृदयासाठी अत्यंत घातक ठरते. जवळपास असेच धोके सिगारेट पिल्याने आणि तंबाखू खाल्ल्याने होतात.