पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – पुण्यातील एका पन्नास वर्षीय महिलेचा अपघात झाल्यानंतर तिला जहांगीर रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या महिलेचे प्राण वाचविण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, त्यास यश आले नाही. या महिलेस डॉक्टरांनी ब्रेनडेड असल्याचे सांगितले. अवयवयदानासाठी या महिलेच्या कुटुंबियांनी स्वत: पुढाकार घेतल्याने तिचे यकृत आणि किडनी दान करण्यात आले.
या अवयवदानामुळे तीन रूग्णांना जीवदान मिळाले आहे. विशेष म्हणजे मृत महिलेच्या कुटुंबियांनी अवयवदानासाठी स्वत:हून पुढकार घेतल्याने हे सहज शक्य झाले. अवयवदानाबाबत समाजात होत असलेली जागृती या घटनेतून दिसून आली आहे.या बाबत सविस्तर वृत्त असे की, पुण्यातील शंकर शेठ रोडवर २८ मे रोजी रात्री अकरा वाजता ५० वर्षीय जैन या महिलेला अपघात झाला. यानंतर त्यांना पुण्यातील जहांगीर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्यावर २.३० वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. जैन यांना वाचवण्याचे डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. परंतु, उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना ब्रेनडेड घोषित केले.
यानंतर महिलेच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी कोणताही विचार न करता तातडीने अवयवदानाचा निर्णय घेतला. तसे प्रत्यारोपण समन्वयक व्रिंदा पुसळकर आणि डॉ. सोमानी यांनाही या कुटुंबियांनी सांगितले. अवयवदान शस्त्रक्रियेनंतर यकृत नाशिकच्या अपोलो रूग्णालयातील ३२ वर्षीय रूग्णाला दान करण्यात आले. तसेच एक किडनी जहांगीर रूग्णालयातील ५६ वर्षीय रूग्णास तर दुसरी किडनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील ५० वर्षीय व्यक्तीस देण्यात आली.
या सर्व प्रक्रियेमध्ये डॉ. सचिन वझे, डॉ. श्रीनिवास अंबिक, डॉ योगेश सोहोनी आणि डॉ. किरीपेकर आणि भूलतज्ज्ञ अवंतिका भट यांचा सहभाग होता.जहांगीर रूग्णालयातील ज्या रूग्णाला किडनी दान करण्यात आली आहे तो गेल्या २-३ वर्षांपासून किडनीदात्याच्या प्रतीक्षेत होता. आता या व्यक्तीवर यशस्वीरित्या किडनी प्रत्यारोपण करण्यात आले असून त्यास डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दु:खद प्रसंगातही जैन कुटुंबियांनी अवयवदाना निर्णय घेतल्याने डॉक्टरांनीही जैन कुटुंबियांचे आभार मानले आहेत.