‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा, जाणून घ्या ‘उपवासचं आगळं वेगळं महत्व’ !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – (शलाका धर्माधिकारी ) – भारतीय संस्कृतीमध्ये उपवासाला महत्व देण्यात आले आहे. आज आपण उपवासाचा खरा अर्थ काय हे पाहणार आहोत. उप – जवळ असणारा आणि वास म्हणजे अस्तित्व उपवास म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाच्या जवळ राहणारा. उपवासाचा संबंध बरेच जण केवळ खाद्यपदार्थांशी जोडतात . परंतु हे अयोग्य आहे. उपवासाचा संरचना ही शरीराच्या शुद्धी साठी आणि मनाच्या सात्विकतेशी जोडलेली आहे .

उपवास करण्यामागचे कारण –

मोठे उपवास अर्थात एकादशी , महाशिवरात्र हे बरेच जण मनापासून ठेवतात. परंतु परमेश्वर कधीही त्यांच्या भक्तांना उपाशी राहा किंव्हा ठराविक पदार्थाचं खा असा असा सांगताना कुठे पुराणात लिहिलेले वाचनात आले आहे का ? उपवासाचा पूर्णपणे संबंध हा शरीर आणि मनाशी आहे . परमेश्वर भक्तीच्या धाग्याने उपवास बांधून ठेवतो . एकादशी आणि श्रावणाची चाहूल लागताच सुरु होणारे मोठे उपवास हे ऋतुबदलाने मानवी शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी आहेत. पावसाळा म्हंटल की आजारालाही आमंत्रण मिळतात आणि मानवी शरीरातील आजाराचे मुख्य उगमस्थान हे पोट आहे. त्यासाठी पोटाच्या पचनक्रियेला हलके कार्य दिल्याने पोट शांत आणि स्वस्थ राहते आणि पोट जर शांत असेल तर शरीराच्या सर्व क्रिया या सुरळीत राहतात. मन प्रसन्न राहते .

परंतु आजकाल उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी, भगर, उपवासाची थालीपीठ, साबुदाणा वडा अशा पदार्थांवर ताव मारला जातो. पण या पदार्थांमुळे अनेकांचे पोट शांत राहण्याऐवजी खराब होते. मग अशा उपवासाचा उपहास होऊन ‘एकादशी दुप्पट खाशी’ अशी म्हण तयार झाली. वास्तविक पाहता उपवास हा दूध, उष्ण नसणारी फळे अर्थात पपई , आंबा अशी फळ न घेता संत्री, किवी, केळी अशा फळांचे किंवा ज्यूसचे सेवान करावे . जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि सर्वात महत्वाचे परमेश्वराचे नामस्मरण करावे म्हणजेच विचारही मनात चांगले ठेवावे . वाईट दिवस आठवून मन खराब करणे , कोणाविषयी वाईट विचारही मनात आणू नयेत. अशा उपवासानेच खऱ्या अर्थाने उपवासाचे खरे फळ मिळेल. रात्री उपवास सोडायचा असेल तरीही सात्विक आहाराने सोडावा.

कांदा , मुळा भाजी अवघी विठाई माझी ….. सात्विक आहार हा मानवी शरीर आणि मन निरोगी आणि सुदृढ ठेवते . आजच्या जीवनशैली नुसार फास्टफूड , नॉनव्हेज ,मद्यप्राशन हे आयुष्याचा एक भाग झाले आहेत . पण यामुळेच हृदयरोग , किडनी , पोटाचे विकार यांचे प्रमाणही अधिक आहे . कॅन्सर आणि एड्स सारखे आजार जीव घेत आहेत. जुनी पिढी हि शिकली सावरली नव्हती म्हणून उपवासाचे महत्व पटवून देण्यासाठी देवाच्या नावाची भीती घातली होती . उपवास केला , दिवसभर नामस्मरण केले कि कोणाशी वाद , विवाद न होता मनःशांती मिळे . असे समजून लक्ष खरंच परमेश्वर अर्थात स्वतःतील परमात्म्यात लिन होत होते . परंतु आजचे ‘शिकले तेवढे हुकले’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .

उपवासाचे खरे सत्व जाणून स्वतःतील परमात्म्याशी संवाद साधावा . अशा उपवासाने मानसिक विकार आणि शाररिक विकार नक्कीच दूर होतील .