तरूणपणातील चूकांमुळेच म्हातारपणी सतावते सांधेदुखी

पुणे : आरोग्य नामा ऑनलाइन – म्हातारपणी सांधेदुखी, अशक्तपणा हा जाणवतोच, असे म्हटले जाते. परंतु, ही आपल्या निष्क्रियतेची लक्षणे आहेत. सांधेदुखी आणि अशक्तपणा याचा वयाशी संबंध नाही. सांध्यांच्या आजारासाठी आपणच जबाबदार असतो. खूप वेळ आरामखुर्चीवर बसणे, अधिक चरबीयुक्त पदार्थ खाणे, लठ्ठपणा यामुळे हे आजार होतात. वय वाढले की हे आजार येतात, हा विचारच या आजारांचे प्रमुख कारण आहे. गुडघ्यांच्या आजार भविष्यात टाळायचे असतील तर एरोबिक्स करावे. तसेच ऑफिसमध्ये मान, गुडघ्यांचे स्ट्रेचिंग नियमितपणे केले पाहिजे.

म्हातारपणी चालताना किंवा फिरताना गुडघ्यात वेदना होतात. सांधेदुखीचा त्रास बळावतो. परंतु, म्हातारपणी हा त्रास होण्याचे कारण म्हणजे तरुणपणी शरीराकडे केलेले दुर्लक्ष होय. नियमित व्यायाम केल्यास वृद्धावस्थेतही निरोगी आयुष्य जगता येते. नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्सने या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केल्या असून त्यानुसार, हाडे किंवा सांधेदुखीचा आजार वृद्धांनाच होतो हा गैरसमज असून सध्या ३० ते ४० टक्के तरुणांमध्येही धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन, स्थूलपणा, जंक फूड्स आणि आरामदायी जीवनैशीलमुळे हाडांचे आजार वाढले आहेत. गुडघे, सांधेदुखीला वैद्यकीय भाषेत ऑस्टियो आर्थरायटिस असे म्हणतात. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेतल्यास हा आजार म्हातारपणीही होणार नाही.