सावधान ! पुण्यात मुलांमध्ये विषाणूजन्य ताप, अतिसार, डेंग्यू आणि हँड-फूट-माऊथ आजाराची ‘साथ’  

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसामुळे उन्हाळ्यापासून दिलासा मिळत असला तर या कालावधीत प्रौढांसोबतच मुलांच्याही आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होते. गेल्या काही आठवड्यांत खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये मुलांमध्ये विषाणूजन्य ताप, अतिसार, डेंग्यू आणि हँड-फूट-माऊथ हा आजार झालेल्या मुलांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. याबाबतची माहिती खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक्स निओनॅटोलॉजीमधील प्रमुख सल्लागार डॉ. तुषार पारीख यांनी दिली.

डॉ. तुषार पारीख यांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदाच्या वर्षी विषाणूजन्य तापाचे रुग्ण अधिक आहेत आणि येत्या काही दिवसांत डेंग्यूचे रुग्ण वाढण्याचीही शक्यता अधिक आहे. एकाच कुटुंबातील ३-४ जणांना विषाणूजन्य आजार किंवा डेंग्यू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खराडीमध्ये नवीन बांधकामे उभी राहत असल्याने साचलेल्या पाण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. त्यामुळे डासांची वाढ होते आणि डेंग्यूचा फैलाव होतो. त्याचप्रमाणे अलीकडेच शाळाही सुरू झाल्या आहेत आणि ५ वर्षांखालील मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे मुलाला विषाणूजन्य आजार किंवा हँड-फूट-माऊथ आजार झाला असेल तर सहजपणे दुसऱ्या मुलाला होऊ शकतो.’

डॉ. तुषार पारीख म्हणाले की ,’मी दररोज ३० रुग्णांची तपासणी करतो. त्यांच्यापैकी १२ रुग्ण विषाणूजन्य तापाचे, ६ अतिसाराचे, १-२ डेंग्यूचे आणि १-२ हँड-फूट-माऊथ आजार झालेले रुग्ण असतात. विषाणूजन्य ताप असलेल्या मुलांमध्ये खोकला, पाणावलेले डोळे, कणकण अशी लक्षणे दिसून येत आहेत. ज्यांना डेंग्यू आहे त्यांना जास्त ताप आहे, शरीरात वेदना होत आहेत, अत्यंत अशक्तपणा जाणवत आहे आणि डोके दुखत आहे. त्याचप्रमाणे घसा खवखवणे, तोंड येणे, हाताच्या आणि पायांच्या तळव्यावर वेदनादायक पुळ्या येणे हे हँड-फूट-माऊथ आजाराची लक्षणे आहेत.’

विषाणूजन्य ताप, अतिसार, डेंग्यू आणि हँड-फूट-माऊथ या आजारांपासून संरक्षण व्हावे म्हणून पालकांनी विशेष काळजी घ्यावी असेही आवाहन  डॉ. पारीख यांनी केले आहे. आपली मुले आरोग्याच्या दृष्टीने नीट स्वच्छता राखत असल्याची खात्री पालकांनी करून घ्यावी, गर्दीची ठिकाणे टाळावी जेणेकरून विषाणूजन्य आजार आणि हँड-फूट-माऊथ आजार होणार नाही. असे आजार झालेल्या मुलांना शक्यतो घरीच ठेवावे, शाळेत पाठवू नये.

अन्यथा या आजाराचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे. डासांचा चावा टाळण्यासाठी घराबाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे आणि डांसांपासून संरक्षण करणारे क्रीम लावावे. ५ वर्षांखालील मुलांना फ्ल्यूची लस दर वर्षी द्यावी. मुलांनी निरोगी राहण्यासाठी सर्व लसी वेळेवर घ्याव्या. त्याचप्रमाणे संतुलित आहार घ्यावा व रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळावेत जेणेकरून अतिसाराचा धोका उद्भवणार नाही. अतिसाराची साथ असेल तर उकळून थंड झालेले पाणी प्यावे, कारण अतिसाराला कारणीभूत ठरणारे जंतू पाण्यावाटे पसरतात. अशीही माहिती त्यांनी दिली.