आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दीर्घ श्वास घेण्याचे अनेक फायदे असून उत्तम आणि निरोगी जीवन जगण्याचा हा एक प्रशस्त मार्ग आहे. श्वास घेण्याच्या विविध तंत्राच्या माध्यमातून आरोग्याशी संबंधित समस्या दूर केल्या जाऊ शकतात. दीर्घ श्वास घेणे हे शरीरासह मेंदूसाठी महत्त्वपूर्ण आहे.
श्वासाला नियमित करण्यासाठी ब्रिदिंग व्यायाम करावा. ब्रिदिंग व्यायाम खोल, मंद आणि लयीत असावा. नाकाद्वारे खोल श्वास घ्यावा आणि पोट फुलवत छातीत हवा भरावी. पाचपर्यंत आकडे मोजेपर्यंत असे करावे. नंतर हळूहळू श्वास सोडावा. या वेळी शरीराच्या प्रत्येक पेशी विषारी घटक सोडत आहेत, अशी अनुभूती घ्यावी. नाकाने श्वास घेतल्याने हवा फुप्फुसांमध्ये पोहोचल्यावर आधी ती गरम होते. यामुळे सर्दी-खोकला होण्याची शक्यता कमी असते. तसेच नाकात असलेले छोटे-छोटे केस हे धुळीचे कण आणि हानिकारक जीवाणूंना फुप्फुसांमध्ये जाण्यापासून अटकाव करतात.
तसेच शरीरात भरपूर ऑक्सिजन पोहोचल्याने ७० टक्के विषारी पदार्थांपासून आराम मिळतो. पुरेसा ऑक्सिजन मिळाल्याने मेंदू आणि सर्व अवयवांची कार्यप्रणाली चांगली राहते. तसेच विविध रोगांची शक्यता कमी करण्यासाठीही श्वासाचा व्यायाम फायदेशीर आहे. राग आल्यावर किंवा तणाव असल्यावर शरीराचे स्नायू घट्ट होऊन श्वासाचा वेग मंदावतो. अशावेळी शरीराला कमी ऑक्सिजन मिळतो. परंतु, नियमित ब्रिदिंग केल्याने तणाव नियंत्रणात राहतो. ब्रिदिंग केल्याने शरीराचा स्टॅमिना वाढतो. तसेच यामुळे लवकर थकवा येत नाही. शिवाय शरीराची कार्यक्षमता वाढते.