आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रजोनिवृत्तीच्या आधी काही महिलांच्या बेलीमध्ये अर्थात पोटात अनावश्यक चरबी जमा होते, त्यांना ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका अधिक असतो. थाईज आणि हिप्समध्ये असलेल्या चरबीच्या तुलनेत पोटातील चरबी वेगळी असते. या चरबीमुळे तयार होणारा हार्मोन शरीरात सूज, जळजळ अशी लक्षणे निर्माण होतात. यामुळे हाडे ठिसूळ होऊ लागतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते.
अल्कोहोलचे अतिसेवन केल्याने यकृत, मेंदू व शरीराच्या इतर अवयवांबरोबरच हाडांवरही दुष्परिणाम होतो. अशा वेळी हाडांची घनता कमी होते. यास वैद्यकीय भाषेत ऑस्टियोपेनिया म्हणतात. ती ऑस्टियोपोरोसिसच्या प्राथमिक अवस्थेत होऊ शकते. धूम्रपानाचे व्यसनही ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढवतात. शरीरात कॅल्शियमची कमतरता हेही त्याचे मुख्य कारण आहे. कॅल्शियमचा डोस पूर्ण करण्यासाठी कधीही सप्लीमेंट्सचा आधार घेऊ नये. कॅल्शियमची पूर्तता नेहमी खाद्यपदार्थांच्या माध्यमातून झाली पाहिजे.
कारण त्याच्या सप्लीमेंट्समुळे मुतखड्याचा धोका अधिक असतो, तर ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो. ज्या मुली वा महिलांना मासिक पाळी नियमित येत नाही, त्यांना हार्मोनल असंतुलन होऊ लागते. ही स्थिती रजोनिवृत्तीच्या वेळी होर्णाया त्रासाशी मिळतीजुळती असते. अशावेळी हाडांचे नुकसान होते, तर एनोरेक्सिया अर्थात कमी वजनाने पीडित असल्यास हाडांचे नुकसान होऊ शकते. मासिक पाळी अनियमित असल्यास रजोनिवृत्ती वेळेच्या आधी होऊ शकते. एस्ट्रोजेन हार्मोनची सक्रियता कमी झाल्यामुळे हाडांच्या नूतनीकरणाची गती मंदावते.
हाडांचे नुकसान होण्याची सुरुवात शरीराच्या कोणत्याही अवयवापासून होऊ शकते. दात वा हिरड्यांपासूनही त्याची सुरुवात होऊ शकते. जर जबड्याच्या हाडाचे नुकसान झाले तर दात कमकुवत होऊन पडतात. डेंटिस्टकडे नियमित तपासणी केली तर एक्स-रे काढून ऑस्टियोपोरोसिसची स्थिती समजते.
बेली फॅटमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. तसेच सोडा, अल्कोहोल, धूम्रपानामुळेही हा त्रास होतो. नियमित वर्कआऊट न केल्यासही हाडांचे नुकसान होऊ शकते. शरीराची कार्यप्रणाली आयुष्यभर सुरळीत व व्यवस्थित ठेवण्यात हाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी योग्य भोजनप्रणालीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. वाढत्या वयाबरोबर हाडे ठिसूळ स्वाभाविक आहे, मात्र काही वेळा ही स्थिती आधीच निर्माण होते.