मधुमेह रुग्णांसाठी ‘उंटिणीचे’ दूध फायदेशीर ; घ्या जाणून 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अमूल या दूध कंपनीने काही बाजारामध्ये उंटिणीचे दूध विक्रीसाठी आणले आहे. अहमदाबाद, गांधीनगर आणि कच्छच्या बाजारात सध्या हे दूध उपलब्ध करून देण्यात आले आहे. या दुधाच्या ५०० ग्रॅम बाटलीची किंमत ५० रुपये आहे. हे दूध मधुमेहासह अनेक आजारांवर फायदेशीर असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे हे दूध विक्रीसाठी आणण्यात आल्याचे अमूलने म्हटले आहे.

उंटिणीचे दूध हे अनेक आजरांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे दूध पचण्यासाठी अत्यंत हलके असते. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे दूध विशेष उपयोगी आहे. उंटीणीचे दूध मधुमेह, स्वमग्नता, संधिवात यावर गुणकारी असते. असे  अमूलने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार सांगण्यात आले आहे.

या दुधात मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्यामुळे त्याचा मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर ज्या लोकांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे. त्यांच्यासाठीही हे दूध खूप उपयोगी आहे. कारण या दुधामध्ये ऍलर्जीचे कोणतेही घटक नाहीत. सध्या केवळ अर्ध्या लिटरच्या बाटलीमध्ये हे दूध उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बाकीच्या दुधाप्रमाणेच उंटिणीचे दूधही थंड वातावरणात ठेवावे लागते. त्याचबरोबर हे दूध बाजारात विक्रीसाठी आणल्यानंतर ३ दिवसांच्या आत त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. असे अमूल या कंपनीने म्हटले आहे.