आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुण्यातील आंबेगावच्या अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि जुनिअर कॉलेजमध्ये शाळकरी आणि कॉलेजमधील चार हजार विद्यार्थ्यांनी योगा डे साजरा केला. यावेळी विविध योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यता आला होता.
शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अडथळे दूर करून एकाग्रता अंगी बनवण्यासाठी योगाभ्यास अत्यंत गरजेचा आहे. योगा ही भारताने जगाला दिलेली मानवतेची मौल्यवान भेट आहे. नियमित योगाच्या सरावाने शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. हा संदेश योगादिनाच्या मुहुर्तावर देण्यासाठी हे विद्यार्थी एकत्र आले होते. हा संदेश देत त्यांनी योगासने सादर केली. या उपक्रमावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा, कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे आणि नूतन योग स्टुडिओच्या नूतन प्रदीप कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
योगासन आणि प्राणायाम भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक आजारांवरील रोगप्रतिबंधक लस आहे.जगातील सर्वात तरुणसंख्या असलेला भारत देश निरोगी होण्यासाठी प्रत्येकाने दिवसातील काही वेळ योगाभ्यासासाठी देण्याची गरज आहे, असे नूतन योग स्टुडिओच्या नूतन कुलकर्णी यांनी सांंगितले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शीर्षासन, वृक्षासन, ताडासन, सूर्यनमस्कार ही योगासने आणि प्राणायाम केला. या आसनांमुळे उंची, मानसिक आणि बौद्धिक एकाग्रता वाढले, अशी माहिती या मुलांनी दिली. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळे केवळ योगा दिनाच्या दिवशीच योगा न करता रोज योगा केला पाहिजे असे एन.एन.एस.एसच्या विद्यार्थ्यांनी म्हटले.