आरोग्यनामा ऑनलाइन टीम : चालत्या एक्स्प्रेसमध्येच एका महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्याने सर्व सहप्रवाशी हवालदिल झाले. डॉक्टर उपलब्ध नसल्याने अखेर एका टीसीनेच काही प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसूती केली आहे, या घटनेची माहिती रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करून दिली आहे.रेल्वेच्या दिल्ली विभागात कार्यरत असलेल्या टीसीचे नाव आहे एच.एस. राणा.
रात्रीचा अंधार कापत एक्सप्रेस सुसाट वेगाने धावत असताना एक महिला प्रसुती वेदना होऊ लागल्याने ओरडू लागली. सर्वजण डॉक्टर, डॉक्टर म्हणून ओरडत होते.या महिलेचा आणि प्रवाशांचा आवाज ऐकून टीसी एच. एस.राणा तेथे आले. त्यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून एक्स्प्रेसमध्ये कुणी डॉक्टर आहे का याचा शोध घेतला. पण, यावेळी कुणीही डॉक्टर रेल्वेमध्ये नव्हता. दुसरीकडे या महिलेला वेदना असह्य होत चालल्या होत्या. काय करावे ते राणा यांन सूचत नव्हते.
अखेर राणा यांनी पुढकार घेऊन अन्य प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळाला पाहून आईच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले. एक्स्प्रेसमधील गंभीर वातावरण दूर होऊन क्षणात आनंद पसरला. सर्वांनीच आनंदाने टाळ्या वाजवून बाळाचे स्वागत केले. टीसी राणा आणि काही प्रवाशांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्या महिलेची यशस्वी प्रसूती झाली. रेल्वे मंत्रालयानेदेखील या प्रकाराची दखल घेत टीटीई राणा यांचे कौतुक केले आहे.