पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा ‘स्ट्रेचिंग’

Stretching

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पोट आणि कंबरेचा आकार योग्य असेल तर व्यक्तीमत्व अधिक खुलून येते. मात्र, जर पोट आणि कंबरेचा आकार बिघडलेला असेल तर शरीर बेढभ दिसते. अशावेळी पोट आणि कंबरेसाठी व्यायाम करणे हा एकमेव उपाय आहे. काही जण यासाठी योगादेखील करतात. मात्र, यावर जलद प्रभावी असा स्ट्रेचिंगचा पर्याय खूपच चांगला आहे. पोट आणि कमरेला आकर्षक बनवण्यासाठी स्टेचिंग अधिक प्रभावी आहे. काही दिवस नियमित स्ट्रेचिंग केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.

पोट आणि कमरेच्या भोवती जमा होणारी चरबी जळण्यासाठी व्यायाम खूप आवश्यक असतो. व्यायामामुळे स्नायू बळकट होतात. यासाठी स्ट्रेचिंग हा व्यायाम प्रकार कसा करावा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. यापैकी सिंगल लेग स्ट्रेचिंग करण्यासाठी जमिनीवर आरामात झोपावे. आता डावा गुडघा वाकवून डोके आणि खांदा त्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करावा. या वेळी हनुवटीने छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा.

गुडघे छातीजवळ आणताना श्वास आत घ्यावा. आता डावा हात पोटरीवर आणि उजवा हात गुडघ्यावर ठेवावा. आता उजवा पाय जमिनीवरून ४५ अंशांच्या कोनात वर उचलावा. काही सेकंदांपर्यंत या अवस्थेत रहावे. नंतर सामान्य स्थितीत यावे. हा प्रकार प्रत्येक पायाने पाच-पाच वेळा करावा. जास्तीत जास्त ताण देण्याचा प्रयत्न करवा.