आरोग्यनामा ऑनलाइन टीम – औरंगाबाद शहरातील ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान मिळाले. ज्येष्ठ दात्याच्या यकृताचे पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात तर दोन्ही मूत्रपिंडांचे मुंबईच्या वोकहार्ट रुग्णालयात प्रत्यारोपण झाले. शहरातील कैलासनगरातील ज्येष्ठ नागरिक चक्कर येऊन घरात खाली पडले. त्यामुळे त्यांना तातडीने एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उच्च रक्तदाबामुळे मेंदुमध्ये रक्तस्राव होऊन ते ब्रेन डेड झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.
रुग्णालयातील ब्रेन डेड समितीने त्यांना अधिकृतरीत्या ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर प्रत्यारोपण समन्वयक मनोज गाडेकर यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना अवयवदानाची माहिती दिल्यानंतर निर्णय घेतला. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने (झेडटीसीसी) संबंधित ज्येष्ठ नागरिकाच्या एबी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयामध्ये दोन्ही मूत्रपिंड, तर पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात यकृत पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अवयवदानाची शस्त्रक्रिया पूर्ण होऊन तिन्ही अवयव रस्तेमार्गाने पाठवण्यात आले. रुग्णवाहिकेतून अवयवांची वाहतूक करण्यासाठी खास ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली होती.
एमजीएमचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी, एमजीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. के. सोमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेमध्ये डॉ. आनंद निकाळजे, डॉ. कुलदीपसिंग राऊळ, डॉ. सुशील शिंदे, डॉ. रोहन गुंडरे यांनी रुग्णास ब्रेन डेड घोषित करण्याचे कार्य केले. तर सर्जन टीममध्ये सह्याद्री रुग्णालयाचे डॉ. अनिरुद्ध भोसले, एमजीएमचे डॉ. वर्षा कंदेवाड, डॉ. शैशव पटेल, डॉ. नवीन पहाडे, डॉ. लक्ष्मण पाल यांचा समावेश होता. तसेच भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. पतंगकर, डॉ. सौमिल यांनी काम पाहिले.