पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – हल्लीच्या धावपळीच्या युगात अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही. २४ तास वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या आजच्या संस्कृतीमध्ये बहुतांश लोक बराचसा वेळ संगणकासमोर काम करतात. त्यामुळे ते स्लीपलेसनेसची शिकार ठरतात. ही समस्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी लोक झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र झोपेच्या गोळ्यांना आता एक अनोखा पर्यात आला आहे. त्याचा वापर केल्याने तुम्हाला झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही.
हे एखादे औषध नाही, तर एक रोबोट असून तो तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करतो. वाचून आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे. नेदरलँडमधील उद्योजक जुलियन जग्नेटबर्ग यांनी हा रोबोट तयार केला आहे. रात्री चांगली झोप देण्यात तो अतिशय सहाय्यक ठरेल, असा दावा त्यांनी केला आहे. हा नरम रोबोट मांजरीच्या वजना एव्हडा असून एखाद्या लहान बाळाप्रमाणे श्वास घेतो. झोपण्याच्या प्रक्रियेची नक्कल करण्यासाठी हा रोबोट नकली श्वास तंत्रज्ञाना वापर करतो. ज्यावेळी तुम्ही त्यास आपल्या छातीजवळ पकडता, तेव्हा कुत्रा वा मांजरीला पकडल्यासारखे वाटते. तुम्ही त्यास पकडता, तेव्हा तुम्ही अवचेतन रुपात त्याच्या श्वास घेण्याच्या पद्धतीसोबत जुळवून घेता व त्याच्यातील एक स्पीकर तुम्हाला झोपेसाठी प्रेरित करतो. हा रोबोट ॲपसोबतही जोडलेला असून तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार ॲपमध्ये बदल करू शकता.