ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे दोघांना जीवदान

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – नवी मुंबईतील एका कुटुंबाने ब्रेनडेड रूग्णाच्या अवयवदानाचा निर्णय घेतल्याने या अवदायानामुळे दोन अन्य रूग्णांना जीवदान मिळाले आहे. कुटुंबातील सदस्य अपघातामुळे ब्रेनडेड झाल्यास अवयवदानासाठी आता लोक स्वताहून पुढाकार घेत असल्याने अनेकवर्षे अवयव मिळण्याची प्रतिक्षा करणाऱ्या रूग्णांना दिलासा मिळू लागला आहे. अवयवदानाचे महत्त्व लोकांना पटल्याने ते पुढे येऊ लागले आहेत.

नवी मुंबईत एका ५३ वर्षांच्या व्यक्तीला अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास तातडीच्या उपचारासाठी वाशीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुखापत मोठी असल्याने या रूग्णाची प्रकृती खूप गंभीर होती. डॉक्टरांनी त्यास वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न करूनही यश आले नाही. अखेर २१ जून, २०१९रोजी या व्यक्तीस ब्रेनडेडे घोषित करण्यात आले. या घटनेने रूग्णाचे कुटुंबिय शोकाकुल झाले. एवढे मोठे दुख: होऊनही या कुटुंबाला अवयवदानाचे महत्व माहित असल्याने त्यांनी ब्रेनडेड रूग्णाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.

या व्यक्तीचे कुटुंब अवयवदानाबाबत जागरूक असल्याने रुग्ण ब्रेनडेड झाल्याचे समजताच त्यांनी रुग्णाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला, त्यांचे समुपदेशन करण्यात आले. या व्यक्तीच्या दोन्ही किडनी दान करण्यात आल्याने २ जणांना जीवनदान मिळाले आहे. कुटुंबाच्या परवानगीनुसार या रुग्णाच्या दोन्ही किडनी दान करण्यात आल्या. एक किडनी अपोलो रुग्णालयातील आणि दुसरी किडनी एच. एन. रिलायन्स रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आल्या, अशी माहिती अपोलो रुग्णालयाचे प्रवक्ते सतीश मंजुनाथ यांनी दिली.