खा. नवनीत राणा यांनी संसदेत मांडला कुपोषणाचा प्रश्न
आरोग्यानामा ऑनलाइन टीम – मेळघाटात कुपोषणाची स्थिती गंभीर असून अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी हा प्रश्न संसदेत मांडला. राज्यात कुपोषणाची परिस्थिती गंभीर आहे. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तशी आकडेवारी आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे. २०१५ ते २०१९ या ४ वर्षांत ९,६६४ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मेळघाट आणि पालघर मध्ये सर्वाधिक बालमृत्यूंची नोंद झाली आहे.संसदेत हा प्रश्न मांडताना नवनीत राणा म्हणाल्या की, विदर्भातील मेळघाटात कुपोषणाची समस्या असून येथील लोकांना न्यूट्रिशियन मिळत नाही. तसेच येथील लोकांवर उपचार करण्यासाठी रूग्णालय देखील नाहीत. शिवाय कुपोषणाची परिस्थिती देखील मेळघाटात जास्त आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त कुपोषणाचे प्रमाण हे मेळघाटात आहे. त्यामुळे जर कुपोषणमुक्त भारत निर्माण करायचा असल्यास या भागाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यावर्षी मेळघाटात ४०९ बालमृत्यू आणि १४ मातामृत्यू झालेत. अमरावती जिल्ह्यात १४ तालुके आहेत. या १४ तालुक्यात ० ते ५ वर्षापर्यंत ३८८ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर मेळघाट-धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यात ० ते ५ वर्षापर्यंत एकूण २४७ बालकांच्या मृत्यूंची नोंद आहे, अशी आकडेवारी राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.