आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सांधे आणि स्नायूंच्य दुखण्याचा त्रास साधारणपणे उतार वयात होतो. योग्य आहार आणि व्यायामाची शरीराला सवय असेल तर हा त्रास होणार नाही. मात्र, शरीराकडे दुर्लक्ष झाल्याने अशाप्रकारचा त्रास उतारवयात सतावत असतो. शिवाय हे दुखणे खूपच असह्य असते. चालण-फिरणे अवघड होऊन बसते. काहीवेळा तर बसल्या जागेवरून उठतादेखील येत नाही. अशा त्रासदायक आजाराने अनेकजण त्रस्त असतात. यासाठी काही उपाय घरच्याघरी देखील करता येऊ शकतात. ज्यामुळे दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
शरीराच्या सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना झाल्यानंतर दिवसभर अस्वस्थ वाटते. कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतो. स्नायूंमध्ये निर्माण होणारा आकस व ताणापासून बचाव करण्यासाठी आणि वेदनेपासून सुटका करण्यासाठी विविध उपाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे मालिश करणे होय. वेदना झाल्यास बामने थोडेसे चोळावे. बाममध्ये असलेला पुदिन्याचा सार व कापुराने पेन फायबर्सचे सेन्सर्स ब्लॉक होतात. त्यामुळे वेदना कमी होतात. तसेच चोळल्यामुळे रक्तप्रवाहही सुरळीत होतो. तसेच मॅग्नेशियमची कमतरता असल्यासही स्नायूंमध्ये वेदना होऊ लागतात. भरपूर मॅग्नेशियम असलेल्या केळी, भुईमूग, अॅव्होकॅडो, सर्व प्रकारचे धान्य व सोयाबीनपासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. आंघोळ करताना पाण्यात थोडेसे मीठ मिसळल्यास वेदना कमी होतात.
तसेच हा त्रास घालविण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वर्कआऊटही करता येईल. योगासने, थाय-ची व वॉकिंग अशा एक्झरसाइजमुळे वेदना कमी होऊ शकतात. यापैकी कोणताही व्यायाम करणारांचे स्नायू नेहमी रिलॅक्स असतात. संगीत ऐकल्यानेही सांधे आणि स्नायूंच्या वेदनेपासून सुटका होते, असे एका फ्रेंच संशोधनात आढळले आहे. या संशोधकांना कर्करोगपीडितांवर केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की, जे पीडित ३० मिनिट संगीत ऐकत होते, त्यांच्या वेदना ५० टक्क्यांनी कमी झाल्या. संगीत ऐकल्यानंतर मिळर्णाया आनंदामुळेच वेदनेकडे दुर्लक्ष होते.