जपानचा ताप महाराष्ट्राच्या माथी
June 13, 2019
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : जपानमध्ये कावासाकी हा दुर्मिळ तापाचा आजार असून या तापाचा रूग्ण ठाण्यातील वसईत आढळून आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या ८ महिन्यांच्या बाळाला हा त्रास होत आहे. त्याच्यावर मिरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार करण्यात आले. आठ महिन्यांच्या बाळाला १० दिवसांपासून ताप येत होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार केले तरी ताप कमी होत नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्यास अखेर मिरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले.वोक्हार्ट रुग्णालयात बाळाच्या वैद्यकीय चाचण्या केल्या असता त्यास कावासाकी ताप असल्याचे आढळले.
या मुलाला रुग्णालयात आणलं तेव्हा त्याची प्रकृती खूपच बिकट होती.आजाराचं निदान व्हावं यासाठी टुडी इको चाचणी करण्यात आली.या चाचणी अहवालात मुलाला कावासाकी ताप झाल्याचं निदान झालं. हा आजार जपानमध्ये मुख्यतः आढळून येतो. पण वसईत एक रुग्ण आढळून आला. या मुलाला तातडीने अतिदक्षता विभागात हलवून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.आता या मुलाची प्रकृती उत्तम असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सत्तरच्या दशकात जपानमध्ये या तापाने धुमाकूळ घातला होता. जपानमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पाहायला मिळतात. भारतात एक लाख लहान मुलांपैकी दहा मुलांमध्ये हा आजार दिसून येतो. या आजारात हृदयावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कारण या तापामुळे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना दुखापत होऊन सूज येते. विशेषतः ताप अधिक काळ राहणे, गळ्याच्या आत गाठी येणे, जीभ लाल होणे, यकृताला सूज येणे, पेशी झपाट्याने वाढणे ही या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे ताप अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, अशी माहिती वोक्हार्ट रुग्णालयातील क्रिटिकल केअर विभागातील बालरोग तज्ज्ञ डॉ. अंकित गुप्ता यांनी दिली.