निरोगी जीवनाचे गुपित माहित आहे का? डाळिंब, आवळा आणि संतुलित आहार

Amla

आरोग्यनामा ऑनलाईन टीम-  बदललेली जीवनशैली, स्पर्धा, कामाचा वाढता ताण, सततची धावपळ यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळ मिळत नाही. यामुळेच विविध प्रकारचे आजार बळावतात. केस पांढरे होणे, अशक्तपणा, लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टीदोष यासारख्या आजाराचा सामना करावा लागतो. हे आजार दूर ठेवायचे असल्यास आयुर्वेदात सांगितलेले अगदी सोपे उपाय केल्यास खूप फायदा होऊ शकतो. निरोगी जीवन जगण्याचा आनंद यातून मिळू शकतो.

दररोजच्या धावपळीतही आपले आरोग्य टीकविण्यासाठी काही उपचार आहेत. त्यापैकी काही प्रमुख उपाय आपण येथे जाणून घेणार आहोत. यापैकीच एक आहे आवळा. आवळ्याचा रस, गायीचे तूप, मध व मिश्री प्रत्येकी १५-१५ ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करावे. सकाळी उपाशी पोटी या मिश्रणाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासांपर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांना आपण दूर ठेवू शकतो. हा उपाय तारुण्यावस्था दीर्घकाळ टिकवण्यासाठी लाभदायक ठरतो.

डाळिंबदेखील आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. दररोज डाळिंबाचे सेवन केल्यास अकाली वृद्धत्व येत नाही. तारुण्यावस्था दीर्घकाळ टिकून राहते. डाळिंबाचे सेवन रक्ताशी संबंधित अनेक आजारांपासून शरीराला वाचवते तसेच रक्तातील कमतरता दूर करण्यासाठी याचा फायदा होतो. मात्र हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच निरोगी जीवनासाठी संतुलित आहार खूपच महत्वाचा ठरतो. यासाठी दररोज संतुलित आहार घेतला पाहिजे. आहार पचण्यास हलका असावा. शरीराच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होणार नाहीत असा आहार घ्यावा. खाण्यात व्हिटॅमिन, प्रोटीन आणि खनिज तत्त्वांचे जास्तीत जास्त प्रमाण असावे. बाहेरचे खाद्य, तेल, तूप, आणि गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

धावपळीच्या आणि दगदगीच्या सध्याच्या जीवनशैलीमुळे ताण-तणाव सतत जाणवत असतो. परंतु, या ताणतणावामुळे अनेक आजार तारुण्यावस्थेतच जडतात. मानसिक त्रास जाणवत असल्यास चांगल्या मित्रांमध्ये वेळ घालवा. चांगले संगीत ऐका, चांगली पुस्तके वाचावीत. यामुळे मानसिक ताण दूर होण्यास मदत होईल. मानसिक ताण दूर झाल्यस अनेक रोगांना दूर ठेवता येते. शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी लसणाच्या दोन पाकळ्या खाव्यात आणि त्यानंतर थोडे पाणी प्यावे. असे नियमित केल्याने अशक्तपणाची समस्या बरी होते.

शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याच्या चुर्णात बारीक खडीसाखर वाटून मिसळावी. या मिश्रणाला दररोज एक चमचा या मात्रेत रात्री झोपण्यापूर्वी सेवन करावे. यानंतर थोडे पाणी प्यावे. आवळ्याचा मुरब्बा नियमित घ्यावा त्यामुळेही शरीरातील अशक्तपणा कमी होतो.
पांढऱ्या मुसळीचा वापर अशक्तपणा दूर करण्यासाठी होतो. पांढरी मुसळी अथवा धोली मुसळीचे चुर्ण बनवावे. हे चूर्ण एक चमचा आणि एक चमचा वाटलेली मिश्री एकत्र करून घ्यावी. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत याचे सेवन केल्यास शरीराला शक्ती, ऊर्जा प्राप्त होते.