आरोग्यनामा ऑनलाईन टीम : अनेक लोकांना असं वाटतं की दुपारी झोप घेणं काही वाईट नाही, पण एका रिपोर्टनुसार खुलासा झाला आहे की, दुपारी एक तासापेक्षा अधिक वेळ झोप घेतल्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. इएमसी काँग्रेस 2020 द डिजिटल एक्सपिरियन्स मध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार, दुपारी झोप घेणं आणि हृदयाशी संबंधित आजारांचा जवळचा संबंध असल्याचं सांगितलं आहे.
या सर्वेमध्ये 20 पेक्षा अधिक परिक्षणांमध्ये एकूण 3,13,651 लोक सहभागी होते त्यापैकी 39% व्यक्ती दुपारी झोप घेत होते. चीनमधील ग्वान्गझोऊ विद्यापीठाचे शोध लेखक डॉ झे पान यांनी सांगितले की, “दिवसा झोप घेणं संपूर्ण जगात साहजिक आहे आणि सामान्यतः दुपारी झोप घेणं चांगलं असतं असं मानलं जातं.”
ते म्हणाले, “असं समजलं जातं की, दुपारी थोडीशी झोप घेतली तर काम करण्याची क्षमता वाढते आणि झोप कमी झाल्याने होणारे परिणाम टाळता येतात. आमच्या शोधात या दोन्ही बाबी खोडून काढण्यात आल्या आहेत.”
शोधात असं दिसून आलं की, एक तासापेक्षा अधिक वेळ दुपारी झोपणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्ट प्रॉब्लेम आणि मृत्यूचे प्रमाण दुपारी न झोपणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत 30% नी आधिक दिसून आलं. जर रात्रीचा विचार केला तर हा धोका रात्री 6 तासांपेक्षा अधिक वेळ झोपणाऱ्यांमध्ये आढळतो.
पण, दुपारी एक तासापेक्षा कमी वेळ झोपणाऱ्या व्यक्तींमध्ये हा धोका दिसून येत नाही. डॉ पान म्हणाले, “ज्या लोकांची झोप रात्री पूर्ण होऊ शकत नाही त्यांनी दुपारी 30 ते 45 मिनिटं झोप घेतली तर त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.”