आरोग्यनामा ऑनलाइन टीम – होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी औषधांची खरेदी किंवा साठा करण्यास परवानगी नाही. तसेच ते रुग्णांना अॅलोपॅथी औषधेही देऊ शकत नाही, असा नियम आहे. आता होमिओपॅथी डॉक्टरने चिठ्ठीत लिहून दिेलेली अॅलोपॅथीचे औषधे देणाऱ्या केमिस्टवर कारवाई करण्याचा निर्णय राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे. ऑल फूड अँण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनने एफडीएला पत्र पाठवून अशा केमिस्टवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
सहा महिन्यांचा ब्रीजकोर्स केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. हा सहा महिन्यांचा कोर्स होमिओपॅथी डॉक्टरांनी पूर्ण केल्यानंतरच ते रुग्णांना अॅलोपॅथी औषधे देऊ शकतात. परंतु, त्याआधीच काही डॉक्टर त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना अॅलोपॅथीची औषधे लिहून देत असल्याचे आढळले आहे. दरम्यान, होमिओपॅथी डॉक्टरांनी चिठ्ठीवर अॅलोपॅथी औषध लिहून दिलेली असतानाही कमिस्ट ही औषधे रूग्णांना देतात.
यासाठीच ऑल फूड अँण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनने एफडीएच्या औषध विभागाला पत्र पाठवून अशा केमिस्टवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एफडीएने केमिस्ट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.बीजकोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांनाच सरकारने अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिली आहे. परंतु अजून बीजकोर्सची एकही बॅच शिक्षण घेऊन बाहेर पडलेली नाही.
तरीही होमिओपॅथी डॉक्टर रुग्णांना अॅलोपॅथी औषध लिहून देऊ लागले आहेत. तसेच या चिठ्ठीवर औषध विक्रेतेही रुग्णांना औषधे देत आहेत. औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० नुसार हा गुन्हा असल्याने अशा किरकोळ औषध विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचा परवाना निलंबित करावा, अशी मागणी ऑल फूड अँण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनने एफडीएकडे केली होती. ही मागणी आता एफडीएने मान्य केली आहे.
यासंदर्भातील एफडीएने म्हटले आहे की, डॉक्टरांच्या चिठ्ठीवर औषधांची विक्री करणे आणि डॉक्टरांनी स्वतः औषधांचा साठा करून रुग्णांना विकणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे होमिओपॅथी डॉक्टर अॅलोपॅथीचा साठा बाळगत असल्याप्रकरणी वारंवार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पण होमिओपॅथी डॉक्टर चिठ्ठीत अॅलोपॅथी लिहून देत असतील आणि औषध विक्रेतांना हे माहिती असून ते ग्राहकांना ही औषध विकत असतील तर अशा विक्रेत्यांची माहिती एफडीएला द्यावी. त्यानुसार तपास करून संबंधित औषध विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.