आरोग्यनामा ऑनलाईन- घरात लहान मुलांना(children ) जेवणाव्यतिरीक्त मध्येच जेव्हा भूक लागते तेव्हा अनेकदा आपण त्यांना जंक फूड खायला देतो. परंतु यामुळं त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याऐवजी आपण त्यांना(children ) काही पौष्टीक पदार्थही खायला देऊ शकतो.
1) सुकामेवा – सुक्या मेव्यातील नट्स मधल्या वेळेतील खाण्यासाठी अर्थातच स्नॅकिंगसाठीचा एक उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे या सुक्यामेव्यानं पोटही पटकन भरतं आणि ते आरोग्यासाठी तितकं पौष्टीकही असतं. याचं सेवन मर्यादित असेल तर यामुळं वजन कमी होण्यासही मदत होते. सुक्यामेव्यात आरोग्याला फायदेशीर ठरणारे स्निग्धांश, प्रथिनं आणि फायबर यांचा अचूक समतोल असतो. तेव्हा मधल्या वेळी अचानक भूक लागल्यास बदाम, काजू, अक्रोड, खजूर असे नट्स खाता येतील.
2) फळं – सफरचंद किंवा केळी अशा फळांमध्ये चांगल्या प्रकारे कर्बोदके, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. सफरचंदामधील फायबरमुळं पोट तर भरतंच परंतु त्यासोबतच पुढं बराच काळ भूक लागत नाही. केळी तर सर्व मोसमात सहज उपलब्ध असतात. परंतु त्यात कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असल्याचं म्हटलं जातं. प्रत्यक्षात प्रत्येक केळीमध्ये अवघ्या 100 कॅलरीज असतात. चॉकलेटच्या एका तुकड्यात त्यापेक्षा कितीतरी अधिक कॅलरीज असतात.
3) भाज्या – कोणत्याही वेळी आणि कच्च्याच खाता येतील अशा भाज्यांमध्ये काकडी आणि गाजर यांचा समावेश होतो. दोन्हीत भरपूर फायबर असतं. गाजरातील फायबरमुळं पोट भरतंच सोबतच त्यातून शरीराला अ जीवनसत्व आणि कॅरोटेनॉइड्सही मिळतात. काकडीत पाण्याचं भरपूर प्रमाण असतं. म्हणूनही पोट अधिक काळासाठी भरलेलं राहतं. गाजर काकडी चण्याच्या चटपटीसोबत खाल्ल्यास हे मधल्या वेळचं खाणं अधिकच चवदार आणि अधिक पौष्टीकही बनू शकतं.
4) अंडी – अंडी हा सर्वात पौष्टीक आणि वजन कमी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे. त्यात प्रथिनांची मात्रा जास्त असते. तसंच भरपूर जीवनसत्वंही असतात. अंडी पोट भरण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि त्यांच्यामुळं कॅलरींची संख्याही कमी होऊ शकते. याचा फायदा वजन कमी होण्यासाठी होऊ शकतो.
5) दही – दही फक्त वजन कमी करण्यासाठीच गुणकारी नाही तर यामुळं पोटात अन्नाचं पचन होण्यासाठी मदत करणारे चांगले बॅक्टेरिया निर्माण होतात. याशिवाय यामुळं शरीराच्या पचनयंत्रणेला थंडावा मिळतो आणि अॅसिडिटीही कमी होते. दही हे चांगल्या प्रकारच्या स्निग्धांशांनी समृद्ध असतं, ज्यामुळं पोट साफ राहतं. आणखी एक फायदा असा की, दह्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, जे स्त्रियांच्या हाडांसाठी चांगलं आणि महत्त्वाचं असतं.
6) घरच्या घरी बनवलेल्या स्मूदीज – मिल्कशेक्सऐवजी पौष्टीक स्मूदीजचा पर्याय अधिक चवदार आणि पारंपरिक मिल्कशेकच्या कृतीच्या अधिक जवळ जाणारा आहे. स्मूदी प्रथिनं आणि पौष्टीक घटकांनी समृद्ध असते. तसंच त्यात गोडवा देखील असतो. त्यामुळं या स्मूदीसाठी तुम्ही मिश्र फळं, सफरचंद आणि अव्हॅकाडो अशी फळं वापरू शकता.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.