वृद्धेवर यशस्वी क्रॅनिअल रेडिओ सर्जरी
सातारा : आरोग्यनामा ऑनलाईन – सातारा येथील एका वृद्ध महिलेला पॅपिलरी थायरॉइड कार्सिनोमा असल्याचे निदान काही वर्षांपूर्वी झाले. या आजारावरील उपचार सुरू असताना त्यांच्या मेंदूमध्ये १.८ सेमी आकाराचा ट्यूमर असल्याचेही निदर्शनास आले. हा ट्यूमर थायरॉइड भागापासून मेंदूपर्यंत पसरला होता. त्यामुळे तो एक मेटास्टॅटिक पॅपिलरी कार्सिनोमा झाला होता. विस्तृत मूल्यमापनानंतर डॉ. सिद्धेश त्र्यंबके आणि त्यांच्या टीमने हा आजार पूर्ण बरा करणारे उपचार करण्याचे ठरवले आणि रेडिओसर्जिकल उपचार करण्याचे नियोजन करण्यात आले.
स्टिरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी (एसआरएस) ही अशा प्रकारची एकमेव उपचारपद्धती आहे, ज्यात रेडिएशनचा अधिक प्रमाणातील डोस शरीरातील छोट्याशा भागावर केंद्रीत करण्यात येतो. ही अगदी साहजिक निवड होती. असे असले तरी रुग्णाच्या परिस्थितीचे काळजीपूर्वक मूल्यमापन करणे आवश्यक होते. डॉ. सिद्धेश त्र्यंबके आणि वरिष्ठ फिजिसिस्ट विक्रम राजा यांनी ३-४ दिवस याचे काटेकोर नियोजन केले आणि ही प्रक्रिया अचूकतेने पार पाडली. साताऱ्यातील ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमधील कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट याबाबत माहिती देताना डॉ. सिद्धेश त्र्यंबके म्हणाले, पॅपिलरी थायरॉइड कार्सिनोमा बरा होण्याची शक्यता जास्त असते, रुग्ण बऱ्यापैकी चांगल्या परिस्थितीत असतो आणि ट्यूमर आकाराने लहान दिसत असल्याने या रुग्णावर हीच प्रक्रिया करणे आम्हाला योग्य वाटले.