आरोग्यनामा ऑनलाईन – दातदुखीच्या वेदना असह्य असतात. इतर कुठल्याही आजारातील वेदना काहीकाळ सहन करणे शक्य असते मात्र, दातदुखीच्या वेदनांमुळे माणूस हवालदिल होतो. हे टाळायचं असेल तर दातांचं आरोग्य आपण राखलं पाहिजे. आणि दातांचं आरोग्य राखणे हे प्रत्येकाच्या हातात आहे. यासाठी दिवसातून दोन वेळा दात घासणं, चूळ भरणं अशा सवयी लावून घेतल्या पाहिजेत. काही पदार्थ दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. असे पदार्थ आपण टाळले पाहिजेत.
लोणचं आंबट असल्याने त्यामध्ये अॅसिडची मात्रा असते. २००४ मध्ये केलेल्या संशोधनानुसार असं समजलं होतं की, लोणचं खाणं हे दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं. यामध्ये अभ्यास करण्यात आलेल्या व्यक्ती ज्या दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा लोणचं खात होत्या त्यांच्या दातांवर परिणाम होण्याचा धोका ८५ टक्क्यांनी वाढला होता. साखरयुक्त सोड्याच्या पेयांमुळे दात खराब होतात याची प्रत्येकाला कल्पना असते. मात्र अशा पेयांमध्ये असणाऱ्या साखरेपेक्षा सोड्यामध्ये असलेल्या अॅसिडमुळे दातांना अधिक धोका असतो. या सोड्यामध्ये साइट्रीक आणि फॉस्फोरिक अॅसिड असतात ज्यामुळे दातांचं नुकसान होतं.
रेड वाईन प्यायल्याने देखील दातांचं आरोग्य बिघडतं. रेड वाईनमध्ये असणाऱ्या टॅनिन या घटकामुळे रेड वाईन तोंडात सुकते आणि त्यामधील घटक दांताना चिकटतात. यामुळे दात खराब होतात. एखाद्या कपड्यावर वाईन डाग लागतो त्याचप्रमाणे दातांवरही वाईनचा डाग राहतो. कपातली कॉफी संपली की कॉफीचे डाग कपाच्या आताल्या बाजूला पहायला मिळतात. त्याचप्रमाणे कॉफी प्यायल्यानंतर त्याचे डाग दातांवरही लागतात. हे डाग बराच काळ दातांवर राहिले तर दात किडण्याची शक्यता असते.