‘या’ देशांमध्ये महिलांना मिळते मासिक पाळीत सुट्टी !

menstrual-leave

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मासिक पाळीच्या चार दिवसांत महिलांना त्रास होत असल्याने काही देशात महिलांना मासिक पाळीत सुट्टी दिली जाते. अशाप्रकारे ‘पीरिअड लिव्ह’ किंवा ‘मेन्स्ट्रुअल लीव्ह’ द्यावी अथवा नाही, याबाबत काही देशांत अजूनही मतभेद असल्याचे दिसून येते. परंतु, काही आशियायी देशांनी महिलांसाठी या काळात सुट्टी देण्याची पद्धत सुरू केली आहे. विशेष म्हणजे मुंबई सारख्या शहरातही काही कंपन्या महिलांना अशी सुट्टी देतात, हे ऐकुन तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

मासिक पाळीच्यातील त्या चार दिवसात महिलांना त्रास होत असतो. पोटात दुखणे, कंबर दुखणे, क्रँप्स, पाय दुखणे, थकवा असे त्रास या कालावधीत जाणवतात. मात्र हा त्रास सर्वच महिलांना होतो असे नाही. परंतु, मासिक पाळीदरम्यान थकवा येण्याचा त्रास बहुतांश स्त्रियांना होतो. या दिवसांत त्यांची कार्यक्षमता कमी होते, शरीर थकते, मानसिक ताणही येतो. काही महिलांना मासिक पाळीच्या आधी किंवा मासिक पाळीदरम्यान मूड स्विंगसारख्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. आपल्याकडे आजही मासिक पाळीचा अधिकार याविषयी खुलेपणाने बोलले जात नाही हे वास्तव आहे. कपड्याऐवजी सॅनिटरी पॅड वापरा, एवढेच आपल्याकडे बोलले जाते. याचाच अर्थ अजूनही खुलेपणाने बोलण्यावर मर्यादा आहेत.

जगातील काही देशांमध्ये महिलांना मासिक पाळीच्या चार दिवसांत सुट्टी दिली जाते. यामध्ये भारताचे नाव आल्यास अनेकांना आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. कारण आपल्याकडेही पीरिअड लिव्ह हा प्रकार सुरू झाला आहे. मुंबईतील कल्चर मशीन आणि गोझूपा ही डिजिटल मार्केटिंग करणारी कंपनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिलांना अशी सुट्टी देते. महिलांना अशा प्रकारची सुट्टी देण्याचा पाहिला मान जपानला मिळाला आहे. १९४७ ला त्यांच्याकडच्या कामगार कायद्यात बदल करण्यात आला. ज्या महिलांना वेदनादायी पाळी येते, त्यांना सिरिक्युका म्हणजे फिजिऑलॉजिकल लिव्ह जपानमध्ये दिली जाते. दुसऱ्या महायुद्धापासून अशी सुट्टी तिथे दिली जात आहे.

इंडोनेशियात मासिक पाळीची सुट्टी देण्यासंदर्भात विशेष कायदा नसला, तरी महिलांना महिन्यातून दोन दिवस सुट्टी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, येथील काही कंपन्या या कायद्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. तैवानमध्ये वर्षभरात कामगारांना ३० सुट्ट्या दिल्या जातात. या व्यतिरिक्त महिला कामगारांना अधिकच्या ३ सुट्ट्या घेण्याची मुभा आहे. लैंगिक समानता कायद्याअंतर्गत मासिक पाळीची ही सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.

दक्षिण कोरियामध्ये २००१ मध्ये मासिक पाळीची सुट्टी देण्याची पद्धत सुरू करण्यात आली. मात्र, महिलांना अशी सुट्टी येथे दिली जात असल्याने पुरूषांवर अन्याय होत असल्याची भावना येथील पुरूषांमध्ये आहे. विशेष म्हणजे दक्षिण कोरियात स्त्रियांनी ही मासिक पाळीची सुट्टी न घेतल्यास त्याबदल्यात त्यांना पैसे देण्याची पद्धत आहे. झांबियामध्ये स्त्रियांसाठी रोजगाराचे वातावरण निर्माण करण्यासाठी नवीन कायदा करण्यात आला. या कायद्यात मासिक पाळीची सुट्टी देण्याचा नियम करण्यात आला आहे. झांबियात दर महिन्याला स्त्री कर्मचाऱ्यांना एक सुट्टी घेण्याची मुभा आहे. तर चीनमधल्या काही प्रांतांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना एक किंवा दोन जादा सुट्ट्या देण्याचा कायदा आहे. परंतु, या सुट्ट्या घेण्यासाठी अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मेडिकल सर्टिफिकेट येथील महिलांना देण्याची अट घालण्यात आली आहे.