आरोग्यनामा ऑनलाइन टीम : नको असलेली गर्भधारणा आणि सुरक्षित शारीरिक संबंधासाठी कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, एका संशोधनानंतर अनेकांची झोप उडवली आहे. या संशोधनात मोठ्या ब्रॅन्डचे पाच टक्के कंडोम फेल झाले आहेत. ही आकडेवारी चांगलीच धडकी भरवणारी असून लैंगिक रोग आणि नको असलेली गर्भधारणा होण्याचा धोका वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुरक्षित लैंगिक संबंध आणि नको असलेल्या गर्भधारणेपासून बचाव करण्यासाठी कंडोम योग्य पर्याय असला तरी नुकत्याच झालेल्या एका संशोधनाच्या परिक्षणात ५ टक्के कंडोम फेल झाले आहेत. यात जास्तीत जास्त प्रकरणे कंडोम प्रेशर पेलू न शकणे आणि लीकेजचे आहेत. कंडोमची गुणवत्ता तपासणी आणि याच्याशी संबंधित गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी एक आयटीआय फाइल करण्यात आली होती. यानंतर एक महिना देशभरातील वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या ४११ कंडोमचे सॅम्पल घेण्यात आले.
सॅम्पल सेंट्रल ड्रग टेस्टिंग लॅबने स्वत: घेतले होते. त्यातून काही धक्कादायक बाब समोर आल्या आहेत. ४११ सॅम्पलपैकी २२ कंडोम म्हणजे ५ टक्के कंडोम टेस्टमध्ये फेल झाले. या टेस्टचे आदेश आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने दिले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कंडोमची टेस्ट फेल होणे गंभीर आहे. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन सरकारने चौकशीचे आदेश दिले पाहिजे, असे म्हटले जात आहे. यामुळे आजार पसरण्याच्या शक्यतेसोबतच फॅमिली प्लॅनिंग सुद्धा प्रभावित होऊ शकते. कंडोमच्या दर्जाची तपासणी व्यवस्थित होत नसल्याचे यातून दिसून आले आहे.