आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरातील मेंदू हा भाग सर्वात नाजूक आहे. मेंदूला थोडी जरी इजा झाली तरी त्याचे परिणाम अन्य अंगावर दिसून येतात. अनेकदा अशा दुखपतीमुळे जीव जाण्याचाही धोका असतो. दरवर्षी भारतात लाखों लोक डोक्याला गंभीर जखम म्हणजे ट्रॉमेटिक ब्रेन इंजरीने मरण पावतात. यासाठी डोक्याला छोट्या इजेकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
ट्रॉमेटिक ब्रेन इंजरी अपघात अथवा अन्य कारणाने मार लागल्याने होते. मेंदूला खोलवर आघात झाल्यानेही हा त्रास होतो. यामुळे मेंदूच्या आतील नसा फाटतात आणि ब्लीडिंग होते. अनेकदा स्कलमध्ये फ्रॅक्चर होऊन ते मेंदूच्या पेशींमध्ये घुसते. या स्थितीला ट्रॉमेटिक ब्रेन इंजरी म्हणतात. अशा दुखापतीमुळे व्यक्ती काही सेकंद किंवा मिनिटांसाठी बेशुद्ध होते. डोकदुखी आणि उलट्या होतात. बोलण्यात अडचण येऊ लागते आणि चक्कर येते. शरीरावरील नियंत्रण सुटते. तोल सांभाळण्यात अडचण येते. डोळ्यांसमोर धुसर दिसू लागते आणि कानांमध्ये नेहमी आवाज येऊ लागतात. तोंडाची चव बदलते आणि लाइट लावल्यावर किंवा मोठ्या आवाजाने त्रास होऊ लागतो, ही ट्रॉमेटिक ब्रेन इंजरीची लक्षणे आहेत.
अशा प्रकारची इजा झाली असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. कारण बाहेर जास्त जखम नसली तरी आत जखम मोठी असू शकते. याकडे दुर्लक्ष केल्याने डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते आणि व्यक्ती कोमामध्येही जाऊ शकतो. मेंदूमध्ये पुन्हा पुन्हा जखम झाल्यास किंवा ट्रॉमेटिक ब्रेन इंजरीने डिजनरेटिव्ह ब्रेन डिजीज होऊ शकतो. ज्यामुळे व्यक्ती अल्झायमर, पार्किन्स डिजीज आणि डिमेंशियाने ग्रस्त होऊ शकतो. अशा प्रकारची दुखापत डोक्याला होऊ नये यासाठी प्रत्येकाने कोणतेही काम करताना सुरक्षेचा विचार करत काळजी घेतली पाहिजे.