आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मुंबई पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांसाठी येत्या काळात खास खेळण्याची खोली तयार करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे. ज्या रुग्णालयात जागा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी खेळण्याची खोली तयार करण्यात येणार आहे. आधीच आजाराने त्रासलेली मुले आणि त्यांचे पिचलेले पालक यांच्यासाठी अशी खोली खूप उपयुक्त ठरणार आहे.
पालिकेच्या रुग्णालयात लहान मुलांना खेळण्यासाठी एक विशेष खोली तयार करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली होती. या खोलीमध्ये कॅरम, चेंडू, डोलणारे प्राणी, गाड्या, सायकल आदी विविध प्रकारची खेळणी उपलब्ध करण्यात यावीत, तसेच खेळण्याबरोबरच बालवाडी व पहिलीच्या मुलांकरता इंग्रजी व मराठी बाराखडी, आकडेवारी पक्षी, प्राणी, फळे व फुलांच्या चित्रांसहित उपलब्ध करून त्याचे मोठमोठे स्टीकर भिंतीवर लावण्यात यावेत, अशा सूचना डॉ. खान यांनी केल्या आहेत. पालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांपैकी १५ उपनगरीय रुग्णालयांत बालरुग्ण विभाग आहे. त्या विभागाच्या भिंती विविध रंगानी, चित्रांनी रंगवल्या आहेत. तसेच, मुलांना काही खेळणीही उपलब्ध करून दिली जातात. मात्र, आता या रुग्णालयात वेगळी खोली सुरू केली जाण्याची शक्यता आहे.