‘तिने’ ४८ दिवसांनी घेतला नाकावाटे श्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील केईएम रूग्णालयात ४८ दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जन्मापासून ही मुलगी नाकावाटे श्वास घेऊ शकत नव्हती. शस्त्रक्रियेनंतर तिने प्रथमच नाकावाटे श्वास घेतला. नाकातील हाडं वाढल्यामुळे तिला नाकाद्वारे श्वास घेता येत नव्हता. सध्या ती योग्यरित्या श्वास घेत आहे.

या चिमुरडीचे ओठ दुभंगलेले होते. तसेच तिच्या नाकातील हाडं वाढल्यामुळे तिला नाकाने श्वास घेणं शक्य नव्हतं. ही मुलगी सतत तोंडानेच श्वास घेत होती. त्यामुळे दूध पिताना तिला श्वास घेणं शक्य नव्हतं. यासंदर्भात केईएम रूग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. निलम साठे म्हणाल्या की, या मुलीवर एन्डोस्कोपीद्वारे उपचार करण्यात आले. तिचे ओठ दुभंगलेले होते आणि त्यातून तिला हृदयासंदर्भातील समस्या देखील होती. केईएम रूग्णालयात केलेल्या तपासणीनंतर तिला हृदयासंदर्भातील आजार असल्याचं समजलं. बाळ खूपच लहान असल्याने एन्डोस्कोपीच्या लहान उपकरणांची गरज होती. यासाठी कानाच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा वापर करून उपचार करण्यात आले. या उपचारांमुळे ती आता नाकावाटे योग्य पद्धतीने श्वास घेऊ शकते.

आता या बाळाची प्रकृती आता उत्तम असून ते नाकावाटे श्वास घेत आहे. शिवाय दूध पिताना देखील कोणतीही तक्रार नाही. आठवडाभर तिला रूग्णालयात देखरेखीखाली ठेवणार असून त्यानंतर घरी सोडण्यात येईल, डॉ. सोठ्ये यांनी सांगितले.