आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्रियांच्या गुप्तांगात खाज येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण स्रिया या विषयावर फारस बोलत नाहीत. त्यामुळे त्यांची ही समस्या वाढण्याची शक्यता असते. आणि या समस्येवर योग्य वेळी उपाय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे स्रियांच्या गुप्तांगात जर खाज येत असेल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगत आहोत. ते केल्याने तुमची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
१) दररोज आंघोळीच्या वेळी भरपूर पाणी आणि सौम्य साबणाने मायांगाची स्वच्छता राखावी. जास्त उग्र किवा सुगंधित साबण स्वच्छतेसाठी वापरू नये. किंवा सुगंधी द्रव्ये वापरू नयेत.
२) योनिमार्गाच्या आतून स्वच्छता करण्याची गरज नसते. शौचानंतर आणि लघवीनंतर पाण्याने स्वच्छता करताना हात पुढून मागे न्यावा म्हणजे लघवी किंवा योनीचा जंतुसंसर्ग होणार नाही.
३) अंतर्वस्त्रे नेहमी शंभर टक्के सुती असावीत म्हणजे घाम शोषला जाईल. मासिक पाळीच्या वेळी साबण आणि भरपूर पाण्याने नियमित स्वच्छता करणे खूपच आवश्यक असते. दिवसातून तीन वेळा आणि रात्री झोपण्याअगोदर पॅड बदलणे जरुरीचे असते.
४) मधुमेह आणि शारीरिक क्षीणपणाने योनिमार्गाचा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते, कारण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. मासिक पाळी गेल्यावरही योनिमार्गाची आंतरत्वचा खूपच नाजूक बनते, सहजी जंतुसंसर्ग होतो.
५) काही वेळा नायलॉनच्या कपड्यांनी खाज सुटते आणि पांढरा स्रावही जाऊ शकतो. पण त्या वेळी फक्त सुती अंतर्वस्त्र घातली की पुरे. अगदी छोटय़ा मुलींनाही मातीत खेळताना माती, वाळूचे कण योनीत गेल्यानेही स्राव होऊ शकतो. काही वेळा समस्या गंभीर असली तर मात्र डॉक्टरांचा सल्ला आवश्यक ठरतो.