आरोग्यनामा टीम – अनेकांना माहिती नाही परंतु नाकाद्वारे शरीरातील अनेक आजारांना ओळखलं जाऊ शकतं. कारण त्यावेळी नाकामध्ये ठराविक बदल होत असतात. याबद्दल माहिती घेऊयात.
1) नाकातून रक्त येणं – नाकातून अचानक रक्त येण्याची अनेक कारणं असू शकतात. यापैकी महत्त्वाचं आहे ते म्हणजे ड्राय सायनस. वातावरणात जास्त गरमी असल्यास आणि आंबट पदार्थ जास्त खाल्ल्यानंतर नाकातील नसांना इजा पोहाचते आणि नाकातून रक्त येतं. साधारणपणे उन्हाळ्यात ही समस्या जास्त जाणवते.
2) नाक लाल होणं – याची अनेक कारणं असू शकतात. ताप, सर्दी, खोकला यामुळंही नाक लाल होतं. याव्यतिरीक्त असं होणं म्हणजे रायनोफायम आणि रोजेसिया या आजारांचे संकेतही असू शकतात. जे लोक जास्त गोरे असतात त्यांना राग आल्यानंतरही त्यांचं नाक जास्त लाल होतं.
3) वास न येणं – बऱ्याचदा सर्दी किंवा ताप असेल तर नाक बंद असल्यानं वास येत नाही. आपल्याला गंध ओळखायला जमत नाही. डायबिटीजच्या आजाराचंही हे लक्षण असू शकतं. कारण शरीरात साखर जास्त वाढल्यानं वास घेण्याची क्षमता कमी होते. याशिवाय अल्जायमर, पार्किन्सस या आजारांचाही धोका असू शकतो. असं होणं कोरोनाची लागण झाल्याचं लक्षण देखील असू शकतं.
4) नाकातून म्यूकस येणं –नाकातून जर पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा म्यूकस बाहेर येत असेल तर बॅक्टेरियल किंवा व्हायरल इंफेक्शन असू शकतं. जर याचा रंग पाण्यासारखा किंवा पांढरा असेल तर हवा प्रदूषणाचा परिणाम असू शकतो. जर या म्यूकसचा रंग काळा असेल तर श्वसन तंत्रात इंफेक्शन असू शकतं.