आरोग्यनाम ऑनलाईन- प्रदुषणामुळे मानवाच्या आरोग्यला जसा धोका निर्माण झाला आहे, त्याचप्रमाणे पशुपक्षांनाही याचा फटका बसत आहे. प्रदुषणाचा दुभत्या जनावरांच्या दुधावरही परिणाम होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यातच भेसळीचे प्रकार वाढत असल्यानेही दूध खरेदी करताना ग्राहकांना अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
मुंबईतील परळ येथील पशू वैद्यकीय महाविद्यालयातील फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी विभागाने दुधच्या शुध्दतेबाबत २ वर्षांपूर्वी संशोधन सुरू केले होते. या संशोधनासाठी बोरीवली, कल्याण, गोरेगाव, भिवंडी आणि ठाणे या ५ ठिकाणच्या गायी, म्हशीच्या गोठ्यातील दुधाच्या १०० नमुन्यांची तपासणी केली असता त्यात पारा आणि शिसे यांसारखे घातक धातू आढळून आले होते. जर्नल ऑफ अॅनिमल हेल्थ अँड प्रोडक्शनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार दुधात पाऱ्याचे प्रमाण ०.०१ पीपीएम असू शकते. परंतु, संशोधकांनी जेव्हा तापसणी केली तेव्हा बोरीवलीतल्या दुधाच्या नमुन्यात ०.०८ पीपीएम, भिवंडीतील दुधाच्या नमुन्यात ०.०३२ पीपीएम पारा आढळून आला होता
हवा, पाणी आणि वातावरणाच्या प्रदूषणामुळे गायी, म्हशींच्या दुधावर अशाप्रकारे गंभीर परिणाम होत आहे. या संशोधनाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार असून यामध्ये मुंबईतील काही भागातून दुधाचे नमूने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. दुधातील भेसळही मोठ्याप्रमाणात वाढल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून वारंवार तबेले आणि गोठ्यांची तपासणी केली जात आहे. संशयित दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जात असून तपासणीत बऱ्याचदा दुधात फॅटचे प्रमाण कमी आढळत आहे.
अशा दूध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. दुधाचे सेवन प्रकृतीसाठी उत्तम असले तरी दूध प्रदुषित असेल तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. अशा दुधामुळे हृदय, किडनी आणि फुफ्फुसाचे विकार होऊ शकतात. तसेच नखे पांढरी पडणे, केस गळणे या समस्या निर्माण होतात.