मधुमेहामुळे पाय गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी ‘ही’ काळजी अवश्य घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीरात योग्यप्रकारे इन्सुलिन तयार होत नसल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह होतो. मधुमेह हा संपूर्ण शरीराला आणि सर्वच अवयवांना हळूहळू नुकसान पोहोचवतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींना पायाची विशेष काळजी घ्या, असे कायम डॉक्टर्स सांगतात. पायाला जखम होणे ही सर्वसाधारण बाब असली तरी मधुमेही रुग्णांच्या पावलांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. संसर्ग वाढल्याने अनेकदा पाय गमावण्याचीही वेळ येते. त्यामुळे पायाची काळजी का घ्यायची व कशी घ्यायची याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या
‘या’ कारणामुळे होतात पायांना जखमा –
मधुमेहात रक्तवाहिन्या मोठ्या प्रमाणात गोठतात. त्यातून रक्तपुरवठा थांबतो त्यामुळे पायाच्या संवेदना वाहून नेणाऱ्या चेतापेशी या निकामी होतात. त्यामुळे पायाच्या तळव्याच्या व इतर भागांच्या संवेदना नष्ट होतात आणि पाय सुन्न होतात. पायाला जखम झाली तरी ती दुखत नाही. पावलांच्या रक्तवाहिन्यांना दुखापत झाल्यामुळे तळपायाला गरम, थंड अशा जाणिवा किंवा वेदना होत नाहीत. जखम दुखत नसल्याने रुग्ण त्या जखमेवरच चालत राहतो आणि यातून जखम वाढते.
मधुमेहाचा पायांना असणारा धोका कसा ओळखाल –
पाय सून्न किंवा बधीर होणे
तळपायाची जळजळ होणे किंवा पायाला मुंग्या येणे
विविध जिवाणुंमुळे पायाच्या त्वचेला, नखांना जंतूसंसर्ग होणे
पायावरील केस कमी होणे, पायाची त्वचा कोरडी होणे,
पाय अचानक खरबरीत होणे, त्यांना भेगा पडणे आणि पायाचे तापमान थोडेसे वाढणे
पायांचा अथवा बोटांचा आकार बदलणे
पायाची जखम अपेक्षेप्रमाणे बरी न होणे
अशी ‘घ्या’ पायांची काळजी –
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवा.
पायाची नियमितपणे तपासणी करणे. पायाचा तळवा पाहण्यासाठी पायाखाली आरसा धरावा. पायाला जखम झाल्यास घरगुती उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पाय रोज स्वच्छा धुवा व कोरडे करा.
खूप गरम अथवा खूप गार पाण्यात पाय बुडवून ठेवू नका.
पाय धुतल्यानंतर कोरडे करून घ्यावे. बोटांमधील भागही कोरडा करा. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने मलमाचा वापर करा. आंघोळ करताना पायाला प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळा.
पायाची त्वचा मऊ ठेवा. पायांना पेट्रोलियम जेली किंवा क्रीम लावा. बोटांच्या बेचक्यामध्ये लावू नका. तो भाग कोरडा ठेवा.
चालताना चप्पलऐवजी शूज वापरा.
नियमितपणे तज्ज्ञ डॉक्टरांकडून पायांची तपासणी करून घ्या. पायाला काहीही त्रास होत असल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.