आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार वाईट स्वप्नांच्या संख्येला आवर घालणे शक्य आहे. आपण त्यांचे विषयही बदलू शकतो. हे संशोधन करण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. अफगाणिस्तान आणि इराकमधून परतलेल्या अमेरिकी लष्करी अधिकारी आणि सैनिकांना निद्रानाशाने ग्रासल्याने आणि बहुतेकांना युद्धाशी संबंधित वाईट स्वप्ने पडत असल्याने हे संशोधन करण्यात आले होते.
सुमारे ६० लाख अमेरिकी नागरिकांना भयावह स्वप्नांच्या समस्येने ग्रासले आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनाने जुने सिद्धांत खोेटे ठरवले आहेत. स्वप्ने ही अतृप्त कामेच्छा, पालन-पोषणाकडे दुर्लक्ष किंवा चिंता यांचे संकेत आहेत, असा सिद्धांत पूर्वी होता. मात्र, अमेरिकेच्या नव्या संशोधनानुसार चांगली किंवा वाईट स्वप्ने ही मानसिक आजारांचे नव्हे तर प्राथमिक स्वरूपातील मानसिक विकारांचे लक्षण असल्याचे दिसून आले आहे.
या संशोधनात एखाद्या आघातानंतर तणावग्रस्त म्हणजेच पीटीएसडी बनलेल्या ७० टक्के लोकांमध्ये निद्रानाशाची समस्या आढळून आली. प्रोफेसर जर्मेन यांचा प्रोजेक्ट भयावह स्वप्नांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुहेरी उपचार पद्धतीवर केंद्रित आहे. त्यापैकी एक पद्धती प्रेझोसिन नावाच्या औषधाच्या साहाय्याने उपचाराची आहे. १९६० च्या दशकात उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी इजाद प्रेझोसिन हे औषध रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरले. मात्र ते घेतल्यानंतर चांगली झोप लागल्याचे तसेच स्वप्नांचे प्रमाण कमी झाल्याचे अनुभव रुग्णांना आले.
अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी २००० पर्यंत भयावह स्वप्नांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रेझोसिन या औषधाचा वापर केला. मात्र या औषधामुळे केवळ वाईट स्वप्नांचे प्रमाण कमी होत असल्याचे निदर्शनास आले. रुग्णांना सामान्य आणि चांगले स्वप्ने पडत होती. मेंदू आणि विचार सैरभैर झाल्यास स्वप्नांचे जगही विकृत होते, असा निष्कर्ष यावरून काढण्यात आला. ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये इमेजरी रिहर्सल थेरपीमध्ये भयावह स्वप्नांवर अत्यंत सोपी उपचार पद्धती सांगितली आहे. यामध्ये सांगितले आहे की, आपल्या आवडत्या स्वप्नांची कल्पना करा. हे स्वप्न कंटाळवाणे किंवा उदास करणारेही असू शकते. मात्र ते भीतीदायक असणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रत्येक दिवशी नव्या स्वप्नांची कल्पना करावी. त्याची नोंद करून ठेवावी. मग दररोज काही मिनिटे डोळे बंद करून त्या स्वप्नाबाबत विचार करावा. त्यामुळे भयावह स्वप्न पडणे आपोआपच कमी होईल. श्वासोच्छ्वास घेताना होणारा त्रासही भयावह स्वप्नांना कारणीभूत आहे. अनेकदा झोपेत श्वास घेण्याची प्रक्रिया काही क्षणांपुरती थांबते. त्यामुळे मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्याची परिणती भयावह स्वप्नांमध्ये होते. श्वास घेताना होणारा त्रास नाहीसा केला तर भयावह स्वप्न बंद होऊ शकतात. स्वअध्ययनाने चांगली स्वप्ने पाहणे शक्य आहे. पडलेल्या स्वप्नांचे वर्णन दररोज लिहून ठेवावे. काही दिवसांनंतर झोपेत असताना कोणत्या वेळेला कोणते स्वप्न पडले हे तुम्हाला समजायला लागेल. दिवसभरातील तुमच्या चांगल्या-वाईट घडामोडींशी झोपेचा संबंध आहे, असे डॉ. स्टीफन लाबेर्जे यांचे मत आहे.