आरोग्यनामा ऑनलाईन – राजकुमार राव आणि कंगना राणावत यांचा आगामी चित्रपट मेंटल है क्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या याच नावाला मानसोपचार तज्ज्ञांनी विरोध दर्शवला आहे. मेंटल है क्या या चित्रपटात मेंटर हेल्थकेअर अॅक्ट २०१७ मधील विविध सेक्शनचे उल्लंघन केल्याचे म्हणत इंडियन सायकॅट्री असोसिएशनने सेन्सॉर बोर्डाला पत्र पाठवले आहे. तसेच या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.
चित्रपटाला असे नाव देणे अयोग्य व असंवेदनशील असल्याचे असोसिएशनने नमूद केले आहे. हा चित्रपट २१ जूनरोजी प्रदर्शित होत आहे.चित्रपटाच्या मेंटल है क्या या नावावरून डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे नाव बदलण्यासाठी डॉक्टरांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. तसेच इंडियन सायकॅट्री असोसिएशनने सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिले आहे. इंडियन सायकॅट्री असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मुरूगेश वैशव, जनरल सेक्रेटरी डॉ. विनय कुमार यांच्या सहीनिशी हे पत्र सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनला पाठविण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, या चित्रपटाला दिलेले नाव अयोग्य आहे.
जो व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट असंवेदनशील आहे. मानसिक रूग्णांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या सिनेमाचे नाव बदलण्यात यावे. सरकारच्या मेंटल हेल्थ केअर अॅक्ट २०१७ अंतर्गत लोकांना जागरूक केले जात आहे. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या चित्रपटातील बाबी वगळ्ण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.