आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नवजात अर्भक व बालकांमधील शस्त्रक्रिया या वैद्यकीय क्षेत्रामधील सर्वात जास्त आव्हानात्मक मानल्या जातात. बाळ जेव्हा आईच्या उदरामधून जग पाहायला उत्सुक असतं. तेव्हा वेगवेगळ्या आजारांमुळे बाळाला धोका संभवतो अशा वेळी आधुनिक वैद्यकीय उपचार करणे आवश्यक असते. नवी मुंबईतील बालरोग शल्यचिकित्सेसाठी प्रसिद्ध असलेल्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे एका नवजात बालकावर दुर्मिळ शल्यचिकित्सा करून त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
पनवेल येथे राहणारे वळंजू दांपत्याला एक गोंडस मुलगा झाला परंतु बाळाच्या तपासणीत नैसर्गिक दोष असल्याचे प्रसूतिनंतर आढळले, त्याची अन्ननलिका शरीरातच ब्रेक झाली होती व अन्ननलिकेचा खालचा भाग श्वासनलिकेला जोडला गेला होता. यामध्ये बाळाला दूध पाजल्यावर ते फुफ्फुसांमध्ये जातं, बाळाच्या जन्माच्या ८ दिवसांमध्ये याचं निदान होतं. कारण दूध पाजल्यावर बाळाला ठसका लागतो. बाळाला तातडीने तेरणा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ मनीषा शिरोडकर म्हणाल्या. ” नवजात बाळाच्या अशा स्थितीला ट्रॅकियोइसोफेगल फिस्टुला (श्वसननलिका व अन्ननलिकेची चुकीची जोडणी) असे त्याला संबोधले जाते. बालरोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ हेमंत लाहोटी यांनी बाळावर तातडीची शल्यचिकित्सा करून हा जन्मजात दोष दुरुस्त केला, या जोखमीच्या शल्यचिकित्सेला डॉ पूजा घोगरे तसेच भूलतज्ञ डॉ वंदना जवळकर यांची महत्वाची मदत झाली.
तेरणा हॉस्पिटलमध्ये उपल्बध असलेल्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे नवजात बालकावरील ही अवघड शल्यचिकित्सा यशस्वी झाली असून करून त्याची श्वास व अन्ननलिका स्वतंत्र करण्यात आली व पंधराव्या दिवशी बाळाला घरी सोडण्यात आले. पाच हजार बालकांमधून अशी समस्या एखाद्या बालकात आढळते व अशावेळी तात्काळ शल्यचिकित्सा करणे गरजेचे असते. ग्रामीण भागात अनेकवेळा अशा बाळांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा अकाली मृत्यू होतो.”
तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रगत व आधुनिक बालशस्त्रक्रियातंत्रज्ञान व बधिरीकरण तंत्रज्ञान उपलब्ध असून नवजात अर्भके व कमी वजनाच्या बाळांवर कठीण शस्त्रक्रिया यशस्वी होत असून ही मुले पुढील आयुष्य अगदी व्यवस्थित जगत आहेत. काही जन्मजात व्यंगे उदा. अन्ननलिका व श्वसननलिका जोडलेली असणे, आतडी व अवयव छातीत घुसणे, आतडी पूर्णपणे न बनणे, गुदद्वार नसणे, किडनीला सूज असणे, मेंदूचा भाग बाहेर असणे, मणक्याीची गाठ वगैरे अनेक प्रकारच्या व्यंगांच्या शल्यचिकित्सा तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नियमितपणे होत असून अनेक नवजात बालकांना जीवनदान मिळाले आहे.