तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जीभ हा बहुआयामी भूमिका असलेला मानवी शरीराचा एकमेव स्नायू आहे. अन्न गिळणे, मेंदूत चाललेले विचार व्यक्त करणे, अशी कामे जीभ करते. जिभेचा पोत वा रंगात होणारा कोणताही बदल म्हणजे आजार होण्याचा संकेत असतो. शरीरातील अशा प्रकारे खूपच महत्वाचा अवयव असलेल्या जीभेची काळजी घेतली गेली पाहिजे. तसेच तिच्यावर कोणती लक्षणे आढळतात, हेदखील ओळखता आल्यास आजारांची माहिती मिळू शकेल. यासाठी जीभेवरून व्यक्तीचे आरोग्य समजते असे म्हटले जाते.अनेक लोकांच्या जिभेत खूप लव असते. त्यामुळे त्यांचे तोंड नेहमीच सुकलेले असते. जेव्हा जिभेत असलेल्या छोट्या-छोट्या ठिपक्यांमध्ये आकस निर्माण होतो तेव्हा तोंड सुकते. तज्ज्ञांच्या मते, फिलिफोर्म पेपिले म्हणजेच जिभेत असलेल्या चार प्रकारच्या ठिपक्यांपैकी एक होय. हे कॅराटीनपासून बनतात आणि त्यांची तोंडात अचानक वाढ व्हायला लागते. तथापि, कॅराटीन घटकामुळेच लव (बारीक केस) निर्माण होते, त्यामुळे तोंडात लव असल्याचा भास व्यक्तीला होतो. जिवाणूंचा संसर्ग झाल्यास वा प्रतिजैवक घेतल्यास असे होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, जिवाणूंचा संसर्ग, तोंड सुकणे व आहारात पोषक द्रव्यांचा अभाव यामुळेही जिभेवर चट्टे दिसून येतात. हे चट्टे जळाल्यासारखे वाटतात. अशा स्थितीत डॉक्टर पीडिताला औषधांसोबतच मेडिकेटेड च्युइंगम व भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. तसेच ज्यांच्या जिभेत पांढ-या रंगाचा थर साचलेला असतो त्यांनी सावध राहावे, कारण त्यांना एखादा संसर्ग किंवा आजार उद्भवू शकतो. अशावेळी डॉक्टर पीडिताला बुरशीरोधक औषध घेण्याचा सल्ला देतात. त्यापासून बचवासाठी दररोजच्या आहारात दह्याचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोटात आरोग्यदायी जिवाणूंची संख्या वाढते आणि जिभेवर पडणारे चट्टेही नाहीसे होतात. ४०००० पेक्षा जास्त जिवाणू मानवाच्या जिभेत असतात. त्यामुळे ब्रश करण्यासोबतच जिभेची स्वच्छता करणेही अत्यावश्यक आहे.
गुलाबी रंगाची जीभ निरोगी असल्याचा संकेत आहे. याउलट जर तुमच्या जिभेचा रंग गडद म्हणजेच भुरका, काळा असेल तर सावध व्हा. तज्ज्ञांच्या मते अनेकवेळा काही खाल्ल्याने आणि पिल्यानेही असे होऊ शकते. तसेच एखाद्या औषधाचे सेवन केल्यानेसुद्धा काही काळासाठी जिभेचा रंग बदलतो. जिभेचा रंग फिका पडणे म्हणजे तुम्ही अॅनिमिक आहात. शरीरात लोहाची कमतरता आणि तोंडाच्या उतींना पुरेसे ऑक्सिजन न मिळाल्यास जिभेचा गुलाबी रंग फिका पडतो. पेशी व उतीपर्यंत रक्ताच्या माध्यमातूनच ऑक्सिजन पोहोचतो. अशा स्थितीत भरपूर लोह असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.काही वेळा जिभेत सुरकुत्या पडल्याचे दिसून येते. हे गांभीर्याने घेऊ नये, कारण आपल्या आरोग्यावर याचा कोणताच परिणाम जाणवत नाही. अनेकवेळा लहान मुलांच्या जिभेमध्ये अशी लक्षणे जन्मल्यापासूनच असतात. रजोनिवृत्त महिलांच्या शरीरात होणा-या हार्मोनल बदलांची लक्षणे सर्वांत आधी जिभेतच दिसून येतात.