थायरॉइडच्या आजारात आराम मिळण्यासाठी करा ‘ही’ आसने

sarvangasan

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गळ्यातील थॉयरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम करत नसतील तर रक्तात थायरॉक्सिन नावाच्या हार्मोन्सच्या स्तरावर परिणाम होतो. या त्रासामध्ये आराम हवा असल्यास काही योगासने परिणामकार ठरतात. अशाच तीन आसनांची माहिती आपण येथे घेणार आहोत.

पहिले आसन आहे सर्वांगासन. हे आसन करताना जमिनीवर आसनावर शांत झोपा. श्वास बाहेर सोडून कमरेपर्यंतचे दोन्ही पाय सरळ आणि एकमेकांना चिकटलेल्या स्थितीत वर उचला. नंतर पाठीचा भागही वर उचला. दोन्ही हातांनी कमरेला आधार द्या. हाताचे कोपरे जमिनीला चिकटलेले असावेत. मान आणि खांद्यांच्या बळावर संपूर्ण शरीर वर सरळ ताठ उचला. हनुवटी छातीस लावलेली असावी. दोन्ही पाय आकाशाकडे असावेत. दृष्टी दोन्ही पायांच्या अंगठ्यावर किंवा डोळे मिटून श्वास दीर्घ स्वाभाविक चालू द्या. या आसनाचा अभ्यास दृढ झाल्यानंतर दोन्ही पायांना पुढे-मागे झुकवत जमिनीला लावून अन्य आसनेसुद्धा करू शकता. सुरुवातीला तीन ते पाच मिनिटे हे आसन करावे. अभ्यासक तीन तासांपर्यंत या आसनाचा वेळ वाढवू शकतात. हे असान केल्याने वजन नियंत्रित होते, केसगळती थांबते, सुरकुत्या, मुरूम व वाढणाऱ्या वयाचा परिणाम कमी होतो.

दुसरे आहे मत्स्यासन. हे आसन करताना जमिनीवर मांडी घालून बसा. हळूहळू मागे वाका, पूर्णपणे पाठीवर झोपा. आता डाव्या पायाला उजव्या हाताने धरा आणि उजव्या पायाला डाव्या हाताने धरा. कोपरांना जमिनीवर टेकवा. या दरम्यान गुडघे जमिनीला टेकलेले असावे. श्वास घेऊन डोक्याला मागच्या बाजूला वाकवा. तुम्ही हाताच्या साहाय्यानेही तुमच्या डोक्याला मानेकडे वाकवू शकता. या अवस्थेला स्वत:च्या हिशेबाने करा. नंतर दीर्घ श्वास सोडून पुन्हा पूर्ववत अवस्थेत या. हे एक चक्र आहे. या प्रकारे तीन ते पाच चक्रे करा. हे आसन नियमित केल्याने थायरॉक्सिन हार्मोन स्रावासाठी मदत होते. बद्धकोष्ठतेच्या उपचारासाठी ते फायदेशीर ठरते. लैंगिक विकारांपासून बचावण्यास परिणामकारक आहे.

तिसरे आसन उष्ट्रासन असून हे आस न करताना प्रथम वज्रासनामध्ये बसावे. गुडघ्यावर उभे राहावे आणि दोन्ही पायांमध्ये साधारणत: दहा ते पंधरा सें.मी. अंतर ठेवावे. सुरुवातीला मागील पाय काही सेकंद हे पायांच्या बोटावर असावेत. दोन्ही हात स्वीमिंग करतो तसे मागच्या दिशेने फिरवावे आणि मग हळुवारपणे उजव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडावी आणि डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडावी. मानेला मागे न्यावे. या स्थितीत सुरुवातीला दहा सेकंद राहावे. या स्थितीत असताना शरीराचा आकार इंग्रजी अक्षर यूप्रमाणे दिसतो. आता हळुवारपणे हात सोडून पूर्वस्थितीत यावे. पूर्वस्थितीत येताना घाई करू नये. वज्रासनावरून गुडघ्यावर उभे राहताना श्वास घ्यावा. मागे जाताना श्वास सोडावा. आसनस्थितीत नियमित श्वासोच्छ्वास असावा. असे एक चक्र पूर्ण करा याप्रकारे पाच ते सात वेळा करता येते. हे आसन नियमित केल्याने क्रोध दूर होतो. स्नायूमध्ये रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. थायरॉइडसह मधुमेहासाठी हे आसन लाभदायक आहे.