आरोग्यनामा ऑनलाइन टीम : घरातील महिला निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहते, असे म्हटले जाते. घरातील काम म्हणजेच व्यायाम असा काही महिलांचा समज असतो. परंतु, घरकामांमुळे केवळ शरीराचा व्यायाम होतो. उर्जा, मनशांती मिळत नाही. अनेकदा तर या कामामुळे थकवाच जास्त येतो.
गर्भधारणा, मुलांचे संगोपन, घरातील कामे ही जबाबदारी महिलांकडे असल्याने पुरुषांच्या तुलनेत महिलांना योगासनांची जास्त आवश्यकता असते. उर्जा वाढवण्यासाठी त्यांना योगाभ्यास फार गरजेचा आहे.महिलांनी नियमित योगासने केली तर त्यांचे शरीर लवचीक होते. योग्य आहारासोबत नियमित योगासने केल्याने शरीराला सौंदर्य प्राप्त होत असते.थकवा येत नाही. विविध आजारांवर योगासने रामबाण उपाय असल्याने महिलांनी योगासने आवर्जून केली पाहिजेत.
मात्र, योगासने करण्यापूर्वी महिलांनी काही काळजी देखील घेतली पाहिजे. महिलांनी गर्भावस्थेत व मासिक पाळीच्या काळात योगासने टाळावित. प्रसुतीनंतरही २ महिने योगासने करू नयेत. महिलांनी हलका आहार घ्यावा.तेलकट, तिखट व शिळे पदार्थ टाळावेत. योगासने करतांना कांबळ अथवा चादरची व्यवस्थीत घडी करून त्यावर बसावे. तसेच सैल कपडे परिधान करावेत. घट्ट कपडे परिधान केल्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थीत होत नाही.