आरोग्यनामा ऑनलाईन – कॅलफोर्नियात जगातील सर्वात कमी वजनाचे म्हणजे अवघ्या २४५ ग्रॅम वजनाचे बाळ जन्मले आहे. या मुलीचा जन्म झाल्यानंतर तिची प्रकृती अतिशय नाजुक होती. डॉक्टरांनी तर या दाम्पत्यास बाळ अवघे तासभर या जगात राहिल असे सांगितले. पण, देव तारी त्याला कोण मारी, असे म्हणतात ते खरे आहे. हे बाळ आजही सुखरूप आहे. ज्याचे आयुष्य तासाभराचे सांगितले होते. त्याने काही आठवड्यांचा पल्ला गाठला आहे. आता ते पाच महिन्यांचे झाले आहे. यामुळे बाळाचे पालक आनंदीत आहेत.
याआधी २०१५ साली जर्मनीमध्ये २५२ ग्रॅम तर ऑगस्ट २०१८ मध्ये जपानमध्ये २६८ ग्रॅम वजनाच्या बाळाचा जन्म झाला होता. कॅलफोर्नियातील या बाळाचे वजन २४५ ग्रॅम असल्याने ते जगातील कमी वजनाचे बाळ ठरले आहे. कॅलफोर्नियातील शार्प मेरी बीर्च हॉस्पिटलमध्ये या जगातील सर्वात कमी वजनाच्या बाळाचा जन्म झाला आहे. आता ५ महिन्यांनी या बाळाचे वजन २.२ किलो झाले आहे. डॉक्टरांनीही तिच्या जगण्याची आशा सोडली होती. त्या चिमुरड्या बाळाने जगण्याची लढाई स्वत: जिंकली आहे. डॉक्टरांचा शब्द तिने खोटा ठरवत अखेर जगून दाखवले आहे.
बाळाच्या आईने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ती फक्त एक तास तुमच्यासोबत असेल, त्यानंतर ती जगणार नाही, असे तिच्या जन्मानंतर डॉक्टरांनी माझ्या पतीला सांगितले होते. हा तासभर आठवड्यांमध्ये बदलला असून ती आता पाच महिन्यांची आहे.
गरोदरपणात झालेल्या गुंतागुतीमुळे तिच्या आईच्या जिवाला धोका होता. ४० आठवड्यांऐवजी डॉक्टरांनी २३ व्या आठवड्यात प्रसूती करण्याचा सल्ला दिला. सिझेरिनयन करून प्रसूती झाली. २३ आठवडे ३ दिवसांनी डिसेंबर २०१८ मध्ये या बाळाचा जन्म झाला. तिचे वजन फक्त २४५ ग्रॅम असल्याने ती हाताच्या तळव्यावर मावत होती.
युनिव्हर्सिटी ऑफ लोव्हाच्या टिनिएस्ट बेबीज रजिस्ट्रीमध्ये नोंद केल्यानुसार ती जगातील सर्वात कमी वजनाची बाळ ठरली आहे. रुग्णालयात तिचे सेबी असे नाव ठेवण्यात आले. न्यूओनॅटल इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये सेबी ५ महिने होती. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि सर्व कर्मचारी यांनी सेबीची खूप काळजी घेतली. तिचे वजनही हळूहळू वाढत होते. पाचव्या महिन्यात तिचे वजन २.३ किलो झाले. मे, २०१९ मध्ये सेबीला डिस्चार्ज देण्यात आला. आता सेबी तिच्या घरी गेली आहे.