आरोग्यनामा ऑनलाइन – तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन केलं तर यामुळं कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो हे सर्वांनाच माहित आहे. परंतु जर तुम्ही असं सेवन करत नसाल आणि तुम्हाला कॅन्सर होणार नाही असं जर वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण कॅन्सरची इतरही अनेक कारणं आहे. असेही काही लोक आहेत ज्यांना कसलं व्यसन नव्हतं तरीही त्याना कॅन्सर झाला आहे. तोंडाचा कॅन्सर हा तंबाखू व्यतिरीक्त इतरही कारणांमुळं होतो. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
1) जास्त वेळ उन्हात राहणं – तसं पाहिलं तर सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. परंतु जास्त वेळ उन्हात राहिलं तर कॅन्सर होतो. सुर्याच्या अतिनील किरणांमुळं त्वचेचं नुकसान होतं. त्वचेचा कॅन्सर जास्त करून सुर्यप्रकाशामुळं होतो. अल्ट्रव्हायोलेट किरणं खूप हानिकारक असतात. यामुळं जबड्याचा कॅन्सर होऊ शकतो.
2) चुकीची जीवनशैली – आजकाल अनेक पदार्थ हे भेसळयुक्त असल्याचं दिसून येतं. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. हे धोकादायक पदार्थ कॅन्सरच्या पेशी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. खराब तेलात तळलेल्या पदार्थांमुळंही कॅन्सरचा सामना करावा लागू शकतो.
3) दातांचे रोग – तोंड व्यवस्थित साफ न केल्यानं तोंडाच्या संसर्गानं देखील कॅन्सर होऊ शकतो. दातांच्या समस्यांमुळं जबड्याचा कॅन्सर होऊ शकतो. जर तुमचे दात किडले असतील, तुटले असतील तर त्याच्या संसर्गामुळं कर्करोग होऊ शकतो. म्हणून दात स्वच्छ धुवा आणि काही समस्या असतील तर डेंटिस्टला संपर्क साधा.
4) एचपीव्हीची कारणं – एचपीव्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा 200 पेक्षा जास्त विषाणूंचा समूह आहे जो असुरक्षित संभोग, स्पर्श, शिंका येणं आणि खोकल्याद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. यातील बहुतेक व्हायरस कॅन्सरचा प्रसार करत नाहीत. परंतु शास्त्रज्ञांनी सुमारे 12 व्हायरस उच्च जोखीम एचपीव्ही म्हणून मानले आहेत. त्यामुळं कॅन्सर होऊ शकतो.
5) दारू पिणं – केवळ तंबाखूच नाही तर मद्यपान केल्यानंही कॅन्सर होऊ शकतो. जे लोक जास्त मद्यपान करतात त्यांच्यात तोंडाच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो. कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी मद्यपान सोडून देणं हा उत्तम पर्याय आहे.
तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं कोणती ?
1) कॅन्सरच्या सुरुवातीलाच तोंडाच्या आत पांढरी लाल पुरळं किंवा छोट्या जखमा होतात. यावर वेळीच लक्ष दिलं नाही तर पुढं जाऊन तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो.
2) तोंडाची दुर्गंधी येणं, आवाजात बदल होणं, काही गिळण्यास त्रास होणं इत्यादी तोंडाच्या कॅन्सरची सामान्य लक्षणं आहेत. तोंडाचा कॅन्सर हा तोंडात कुठेही होऊ शकतो.
3) तोंडात जखम असणं, सूज येणं, लाळेतून रक्त येणं, जळजळ होणं, तोंडात दुखणं इत्यादी तोंडाच्या कॅन्सरकडे इशारा करतात.
4) तोंडाच्या आत कुठेही गाठ जाणवल्यास तोंडाच्या कॅन्सरचा संकेत असतो. त्यासोबत तोंडात कोणतंही रंग परिवर्तन झालं असेल तर वेळीच तपासणी करावी.
धोका टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
1) तोंडाच्या कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर धूम्रपान, गुटखा, तंबाखू आणि नशेची सवय वेळीच सोडायला पाहिजे.
2) दात आणि तोंडाची चांगल्या प्रकारे स्वच्छता करावी.
3) जंक फूड, प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेटचे पदार्थ कमी खावेत. वेगवेगळी फळं खावीत.
4) तोंडात कोणत्याही प्रकारचा बदल दिसत असेल किंवा तोंडाला असलेली समस्या दूर होत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.