आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शास्त्रज्ञांनी एका संशोधानाच्या आधारे असा दावा केला आहे की, ज्या महिलांना अन्न नलिकेचा किंवा पोटाचा कॅन्सर असतो त्या महिला पुरूषांच्या तुलनेत अधिक काळ जगतात. मात्र, पोटाचा कॅन्सर इतर कॅन्सरप्रमाणेच जीवघेणा असतो. पुरूष असो वा महिला सर्वांसाठीच कॅन्सर हा घातक ठरू शकतो.
पोटाच्या खालच्या भागात खूप पेशी असतात आणि जेव्हा या कोणत्याही अडचणीशिवाय वाढू लागतात तेव्हा पोटाचा कॅन्सर होतो. अन्न नलिका आणि पोटाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट’चा वापर केला जातो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात महिला आणि पुरूष रूग्णांमध्ये दोन वेगवेगळे फरक दिसून आले. पहिला फरक म्हणजे किमोथेरपीदरम्यान कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया असते आणि दुसरे म्हणजे कॅन्सरच्या उपचारानंतर ते किती काळ जगतात.
या संशोधनानुसार महिलांवरील उपचारादरम्यान पोट आणि अन्न नलिकेच्या कॅन्सरच्या थेरपीने होणारे साइड इफेक्ट्सबाबत त्यांना जागरूक करणे आणि सल्ला देणे महत्त्वाचे ठरते. संशोधकांनी हे संशोधन ३ हजार रूग्णांवर केले. यापैकी २, ६६८ रूग्ण पुरूष होते तर ५९७ महिला होत्या. या संशोधनात वैज्ञानिकांना असे दिसून आले की, पुरूष रूग्णांच्या तुलनेत महिला रूग्णांना उलटी, मळमळ आणि डायरियासारख्या समस्यांचा अनुभव येतो. तसेच महिला रूग्ण पुरूष रूग्णांच्या तुलनेत अधिक काळ जगतात. हा शोध ‘अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑनकोलॉजी’मध्ये सादर करण्यात आला आहे.